मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील यांच्या स्थानाकडे लक्ष

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नव्या राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार याची उत्सुकता लागली आहे.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील (संग्रहित फोटो)

दयानंद लिपारे

कोल्हापूर : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नव्या राज्य शासनाचा मंत्रिमंडळाचा चेहरा कसा असणार याची उत्सुकता लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना कोणते स्थान मिळणार याचे कुतूहल आहे. शिंदे – भाजप सरकारला पाठिंबा दिलेल्या चारही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

 विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात विलक्षण घडामोडी घडल्या. त्यातून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री, तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातुन कोणाची वर्णी लागणार याविषयी चर्चा होताना दिसत आहे.

 चंद्रकांतदादांकडे लक्ष

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, सहकार यासह चार प्रमुख खाती होती. त्यामुळे त्यांचे जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील राजकीय वजन वाढले होते. पुढे एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रीपद पाटील यांच्याकडे आल्यानंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री बनले. तर फडणवीस विदेश दौऱ्यावर असताना प्रभारी मुख्यमंत्री म्हणूनही चंद्रकांतदादांनी काम पाहिले होते.

 विरोधक म्हणून प्रभाव

  गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत झाले. तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने विरोधी पक्षाचा आवाज चंद्रकांत पाटील बनले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने त्यांनी आघाडी सरकारवर सातत्याने शरसंधान सुरू ठेवले होते. राज्यात पक्ष संघटन बळकट व्हावे यासाठी ते राज्यव्यापी दौरे करत राहिले. त्यांची सत्तेत असताना आणि विरोधक म्हणूनही कामगिरी प्रभावी राहिली  आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याशी त्यांची गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ जवळीक राहिली आहे. तर भाजपच्या धक्कातंत्रात चंद्रकांत दादांना धक्का मिळणार अशी विरोधकांनी खवचट टिपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रकांतदादांना नव्या मंत्रिमंडळात नेमक्या कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार याविषयी पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेत कुतूहल आहे.

आमदारांनाही मंत्रीपदाचे वेध

 एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जिल्ह्यातील सेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठबळ दिले होते. त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी काहूर उठवले होते. तर त्यांच्या समर्थकांनी जशास तसे प्रत्युत्तर दिल्याने राजकीय संघर्ष तापला होता. आता अबिटकर व यड्रावकर या दोघांच्याही समर्थकांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. यड्रावकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. क्षीरसागर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद कायम राहण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही. तथापि प्रकाश आवाडे व विनय कोरे या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. या दोन्ही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे चार आमदारांपैकी नेमक्या कोणाची आणि कोणत्या पदावर वर्णी लागणार याकडे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attention chandrakant patil position cabinet state government cabinet ysh

Next Story
स्वाभिमानीचा १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; नव्या राज्यशासनाशी पहिला संघर्ष
फोटो गॅलरी