कोल्हापूर : यंदाचा पाऊसकाळ लक्षात घेऊन सहकार विभागाने पावसाळ्यातील निवडणुका ३० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ८३०५ तर कोल्हापूर जिल्ह्यातील २७१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत.

हवामान विभागाने यावर्षी सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यात मागील वर्षाच्या सरासरीच्या १०० टक्के पेक्षा जास्त व पाच जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्के पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : विषय संपला; राज्यात शक्तिपीठसाठी भूसंपादन करणार नाही – चंद्रकांत पाटील

शेतीकामाचा अडथळा

बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणी, पीक लागवड व इतर अनुषंगिक शेती विषयक कामात व्यस्त आहेत. अशा शेतकरी सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

परिणाम कोणावर ?

राज्यात सन २०२४-२५ यावर्षी वर्षात १४ हजार ७१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी ८३०५ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया आता सहकार विभागाच्या गुरुवारच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

हेही वाचा : कोल्हापुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा

यंदा घाई

दरवर्षी पावसाळ्यात सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलल्या जातात. हि प्रक्रिया पाऊसमान वाढल्यावर म्हणजेच जुलै मध्ये सुरु होते. पण यंदा ती आतापासून सुरु झाली आहे.