Axar Patel on Impact Player Rule in IPL 2024 : आयपीएल २०२४ मधील ४०वा सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सवर ४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात दिल्लीचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली. मात्र, विजय मिळवल्यानंतर अक्षर पटेलने प्रभावशाली खेळाडूंच्या (इम्पॅक्ट प्लेअर) नियमावर प्रश्न उपस्थित केले. इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूची भूमिका धोक्यात आल्याचे अक्षरचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक उत्कृष्ट डावखुरा फिरकी गोलंदाज असण्याबरोबरच सक्षम फलंदाज अक्षर पटेल असे मानतो की ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमामुळे अष्टपैलूंची भूमिका धोक्यात आली आहे. बुधवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलेल्या अक्षरने ४३ चेंडूत ६६ धावा केल्या. त्याचबरोबर अक्षरने कर्णधार ऋषभ पंतच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सला अडचणीतून बाहेर काढले आणि संघाला ४ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचवले. एकावेळी दिल्लीच्या तीन विकेट ४४ धावांवर पडल्या होत्या. यानंतर धावांचा बचाव करताना एक विकेटही घेतली.

इम्पॅक्ट प्लेअर’ नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका धोक्यात –

सामन्यानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, “एक अष्टपैलू खेळाडू असल्याने मला वाटत की ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका धोक्यात आली आहे. प्रभावशाली खेळाडू म्हणून प्रत्येक संघाला शुद्ध फलंदाज किंवा गोलंदाज हवा असतो. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंचा वापर होत नाही. इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार, प्रत्येक संघ सहा फलंदाज किंवा गोलंदाजांचा विचार करतो. यामुळे कधी कधी गोंधळ होतो.”

हेही वाचा – BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन

रोहित शर्मानेही व्यक्त केली होती नाराजी –

भारतीय कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी या नियमावर टीका केली आहे. याबद्दल रोहित शर्मा म्हणाला होता की, मी या नियमाचा फार मोठा चाहता नाही. तो अष्टपैलू खेळाडूंचे नुकसान करत आहेत. यामुळे ११ नव्हे तर १२ खेळाडू खेळत आहेत. या नियमामुळे संतुलित संघ निवडण्याचे आणि विद्यमान खेळाडूंसोबत परिस्थितीशी जुळवून घेण्याचे महत्त्व कमी होते, असे त्याचे मत आहे. या नियमावर इतरा खेळाडूंनीही टीका केली आहे.

हेही वाचा – DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार

या चिंता ओळखून, आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी बीसीसीआयकडे या नियमावर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहेत. धुमाळ यांनी जोर दिला की सर्व नियमांचे फायदे आणि तोटे आहेत आणि लीग चर्चेसाठी खुली आहे. त्यांच्या मते कोणताही नियम ‘काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही’. हे त्यांचे विधान चालू आयपीएल हंगाम संपल्यानंतर संभाव्य बदल किंवा नियम काढून टाकण्याची सूचना देते. हा मोकळेपणा खेळावरील नियमाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी बीसीसीआयच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो. मोहम्मद सिराजनेही याला गोलंदाजांसाठी घातक म्हटले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Axar patel questioned on impact player rule in ipl and told it dangerous for the all rounder vbm