Premium

IND vs AUS, WTC 2023 Final: ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास, ४८ वर्षांनी घडला ‘हा’ अजब योगायोग

WTC 2023 Final Match Updates: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ३ बाद ३२७ धावा केल्या आहेत.

Travis Head has made it a coincidence
ट्रॅव्हिस हेड (फोटो-ट्विटर)

Travis Head’s century in WTC Final Match: डब्ल्यूटीसी फायनल सामन्यातील पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावांचा डोंगर उभा केला. ट्रॅव्हिस हेड १४६ धावांवर तर स्टीव्ह स्मिथ ९५ धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत २५१ धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. ट्रॅव्हिस हेडने आपल्या शतकाच्या जोरावर एक मोठा विक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रॅव्हिस हेडचे कसोटीतील हे सहावे शतक आहे. हेडने आपल्या शतकी खेळीत एक खास विक्रमही केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या इतिहासात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याशिवाय, हेडच्या शतकासह ४८ वर्षांनंतर प्रथमच असे घडले आहे, जेव्हा डाव्या हाताच्या फलंदाजाने आयसीसी फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर शतक ठोकले आहे.

तब्बल ४८ वर्षांनंतर असा योगायोग घडला –

यापूर्वी १९७५ च्या विश्वचषकात असा पराक्रम घडला होता. त्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार क्लाईव्ह लॉईडने पाचव्या क्रमांकावर शतक झळकावले होते. आता तब्बल ४८ वर्षांनंतर असा योगायोग घडला आहे. यासह स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत २०० धावांची भागीदारी करणारी पहिली जोडी ठरली आहे. दोघांनी मिळून भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला. त्याच वेळी, हेड आयसीसी फायनलमध्ये शतक झळकावणारा जगातील केवळ तिसरा फलंदाज बनला आहे.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final 2023: आश्विनला वगळण्यावर टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरेनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही…”

आयसीसीच्या फायनलमध्ये शतक झळकावणारे खेळाडू –

१.एकदिवसीय विश्वचषक: क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडिज) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९७५
२. चॅम्पियन्स ट्रॉफी: फिलो वॉलेस (वेस्ट इंडिज) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९९८
३. डब्ल्यूटीसी फायनल: ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध भारत, २०२३

हेही वाचा – IND vs AUS WTC 2023 Final: अश्विनला न खेळवण्यावर सुनील गावस्करांनी उपस्थित केला मोठा प्रश्न; म्हणाले, “रोहित शर्माचा…”

पहिल्या दिवसाच्या खेळाबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२३ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९५) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. तसेच मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 12:10 IST
Next Story
IND vs AUS WTC Final 2023: आश्विनला वगळण्यावर टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरेनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही…”