Who is Sajeevan Sajana : महिला प्रीमियर लीग २०२४ ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. उभय संघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मुंबईसाठी शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत सजीवन सजनाने दिल्ली कॅपिटल्सच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. त्यामुळे सजीवन सजना एका रात्रीत प्रकाशझोतात आली आहे. आता चाहते सजीवन सजनाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे दिल्लीविरुद्ध मुंबईला चार विकेट्सनी विजय मिळवून देणारी सजीवन सजना कोण आहे? जाणून घेऊया.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना मुंबई संघाने चमकदार सुरुवात केली, मात्र अखेरच्या षटकांमध्ये त्यांची गळचेपी झाली. मात्र, डावाच्या शेवटच्या चेंडूवर मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या सजीव सजनाने षटकार ठोकत आपल्या संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची गरज होती.

कोण आहे सजीवन सजना?

सजीवन सजनाचा जन्म ४ जानेवारी १९९५ रोजी केरळमधील वायनाड येथील मनंतवडी येथे झाला. ती भारताकडून एकही सामना खेळलेली नाही.२९ वर्षीय सजीवन सजना देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळकडून खेळते. फिरकी अष्टपैलू खेळाडू सजीवनला प्रथमच महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मुंबई संघाने तिला लिलावात १५ लाख रुपयांना विकत घेतले होते. सजीवन ही अनकॅप्ड खेळाडू आहे. केरळसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याबरोबरच ती भारत अ संघाकडूनही खेळली आहे.

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : भारताने इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर रोखला, रवींद्र जडेजाने घेतल्या ४ विकेट्स

पदार्पणाच्या सामन्यात शानदार कामगिरी करणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते. विशेषत: जेव्हा शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी आवश्यक धावा करायच्या असतात, पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की काहीही अशक्य नसते. सजीवनने हेच खरं करुन दाखवलं. डब्ल्यूपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात, सजीवन सजना मुंबईसाठी आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आली होती. संघाला विजयासाठी पाच धावा करायच्या होत्या. अशा स्थितीत तिने उत्कृष्ट षटकार ठोकला, त्यामुळे मुंबई संघ रोमांचक पद्धतीने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.