शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींबाबत स्पष्ट वक्तव्य केलं असून गद्दारांची अवलाद आपल्यात नको असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नगरसेवकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जात आहे. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आली आहे.”

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला – उद्धव ठाकरे
पुढे बोलताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी काहींनी मला सांगितलं होतं की, तुम्ही राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जात आहात, ते तुम्हाला दगा देतील. मी त्यांना म्हटलं ठीक आहे. त्यांच्या बाटलीवर तसं लेबल लावलं आहे. ते लेबल बघून आम्ही शंकराप्रमाणे विष प्राशन करत आहोत. बघुया काय होतंय. पण आज विशेष काय आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघंही आपल्या सोबत आहेत. सरकार असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत राहू, असं शरद पवार आणि सोनिया गांधींनी जाहीर केलं आहे. पण आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला.”

शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही
“शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा भारतात भाजपा-शिवसेनेला कुणी विचारत नव्हतं, तेव्हा हिंदु मतांची विभागणी होऊ नये, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray aggressive against rebellious mla and eknath shinde rmm