“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो की…”, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य

“मंत्रीमंडळ बैठकीत गोगलगाईंमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही,” अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो की…”, एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचं वक्तव्य
धनंजय मुंडे व एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (११ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना मुंडेंनी या भेटीचं कारण सांगितलं. “मंत्रीमंडळ बैठकीत गोगलगाईंमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही. म्हणून मी याबाबत त्यांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलो होतो,” अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

धनंजय मुंडे म्हणाले, “बीड, लातूर आणि उस्मानाबादचा काही भागात १० हजार हेक्टर शेती गोगलगाईमुळे उद्ध्वस्त झाली आहे. सोयाबीन आणि कापूस वाया गेला आहे. दुबार आणि तिबार पेरणी करूनही गोगलगाईमुळे १० हजार हेक्टर शेतीत रब्बीचं कोणतंही पीक दिसणार नाही अशी स्थिती आहे.”

“मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आठवण करून द्यायला आलो”

“कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेताना गोगलगाईने बाधित शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलो की, या शेतकऱ्यांनाही अतिवृष्टी व पुराप्रमाणेच मदत झाली पाहिजे. याच मागणीसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला आलो,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

गोगलगाईंनी बाधित शेतकऱ्यांनाही मदत देण्याची मागणी

ते पुढे म्हणाले, “जिल्हा प्रशासनाने शेतीच्या नुकसानीचे प्रस्ताव देऊनही अद्याप मंत्रालयातून पंचनाम्याबाबत आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयातून आदेश गेले पाहिजे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना तात्काळ पंचनामे करून इतर शेतकऱ्यांप्रमाणे गोगलगाईंनी बाधित शेतकऱ्यांनाही मदत देण्याची मागणी केली आहे.”

हेही वाचा : “धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेले म्हणून…”; नाना पटोलेंचं नेत्यांच्या भेटीगाठीवर वक्तव्य

“मागच्या ४२ दिवसात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान”

“मागच्या ४२ दिवसात सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालं आहे. हे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालं आहे. मात्र, सरकार असून नसल्यासारखं असल्याने, दोनच लोक कारभार पाहत असल्याने आणि आता मंत्रीमंडळ विस्तार होऊनही खातेवाटप नाही, पालकमंत्री म्हणून अडचणी असल्याने अधिक नुकसान झालं आहे. या अडचणी कधी सुटतील आणि शेतकऱ्याला कधी मदत मिळेल? महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला कधी वाटेल की राज्यात सरकार आहे?” असा सवालही मुंडेंनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dhananjay munde answer why he meet cm eknath shinde pbs

Next Story
“मविआ नैसर्गिक नाही”, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “प्रदेशाध्यक्षांचा निर्णय…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी