राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं साताऱ्यात जलमंदिरमध्ये पन्नास तुताऱ्यांनी स्वागत केलं. हे बघून देवेंद्र फडणवीस गांगरून गेले. असं मिश्किल विधान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केल आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये दिवंगत खासदार गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे यासह बाबर कुटुंबीय उपस्थित होते.
संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ किल्ले दिले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ४०- ४० आमदार दिले. काँग्रेस ने एक आमदार दिला. पण, ज्याला किल्ले दिले तो औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला. शाहिस्तेखानाची बोटे इथेच छाटली गेली, तर अफजल खानाचा कोथळा याच महाराष्ट्रात बाहेर काढला. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा सत्ता काबीज करू. आगामी लोकसभेसाठी शिरूर, बारामती, मावळसह महाराष्ट्र जिंकू असही राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, निशाणी तुतारी आणि मशाल मिळाली. हा शुभ योग आहे. पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे काल साताऱ्याला गेले होते. ते छत्रपतींच्या जलमंदिरमध्ये गेले. त्यांचं स्वागत पन्नास तुताऱ्यानी केलं. ते बघून देवेंद्र फडणवीस गांगारले..एरवी तुतारी स्वागत केले तर प्रसन्न होतात. फडणवीस मात्र गांगारले. अस म्हणताच एकच हशा पिकला. तुतारी आणि मशाल महाराष्ट्राची दिशादर्शक आहे, अस ही ते म्हणाले.