‘बिग बॉस’चे १८ वे पर्व संपले तरी यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक सातत्याने चर्चेत असतात. ९० च्या दशकात अनेक गाजलेल्या चित्रपटांतून जिने भूमिका केल्या, ती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर(Shilpa Shirodkar )देखील या पर्वात सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात तिने तिच्या खेळाने सर्वांची मने जिंकली. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभिनेत्रीला या घरातून बाहेर पडावे लागले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीने काही मुलाखतींमधून केलेले वक्तव्य चर्चांचा विषय ठरले. त्यापैकी एक म्हणजे वाढलेल्या वजनामुळे फराह खानने तिला छैय्या छैय्या या गाण्यात घेण्यास नकार दिला होता. शिल्पा शिरोडकरने खुलासा करण्याआधी फराह खाननेदेखील एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरचे वजन त्यावेळी १०० किलोच्या आसपास असल्यामुळे तिला त्या गाण्यात घेतले नसल्याचे म्हटले होते. आता फराह खानने एका व्हिडीओमध्ये याबद्दल बोलताना माझ्या मनात शिल्पाला नाकारल्यानंतर अपराधीपणा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेव्हा मी ट्रेनवर चढेन…

फराह खानने तिच्या नवीन व्लॉगमध्ये तिच्या कूक दिलीपसह शिल्पा शिरोडकरच्या घरी भेट दिली. यावेळी फराह खानने शिल्पा शिरोडकरचे कौतुक केले. यावेळी शिल्पा शिरोडकरने फराह खानला तिच्या वजनाविषयी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली. त्यावर फराह खानने भविष्यात कधी छैय्या छैय्या-२ चे शूटिंग झालं, तर त्यामध्ये तुला कास्ट करेन, असे म्हणत आश्वस्त केले. यावर शिल्पाने हसत म्हटले की, तेव्हा मी ट्रेनवर चढेन, त्यावर डान्सर असतील आणि शाहरूख खानही असेल.

फराह खानने पुढे म्हटले की, जेव्हा शिल्पाने गाण्यात न घेण्याविषयी वक्तव्य केले त्यावेळी मला खूप वाईट वाटले. मी त्यावेळी विचार केला की, शिल्पा ट्रेनवर कशी चढेल? आणि जरी ती ट्रेनवर चढली, तर शाहरूख कुठे उभा राहील? त्यानंतर शिल्पा शिरोडकरने, फराहने तिला १५ दिवस वजन कमी करण्यासाठी दिले होते आणि त्यानंतरही नाकारले, अशी आठवण सांगितली.

शिल्पा शिरोडकरने नुकतीच सिद्धार्थ कननच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने म्हटले, “मला त्या गाण्यात काम करता आलं नाही. कारण- मी जाड होते. त्यांनी मला मी लठ्ठ आहे, असं सांगितलं. मला छैय्या छैय्या या गाण्यात काम करण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल नेहमी वाईट वाटतं. मात्र, देवानं मला कायमच त्यापेक्षा अधिक दिलं आहे आणि सध्याही तो देत आहे.”

दरम्यान, आता बिग बॉस १८ नंतर अभिनेत्री कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan promises shilpa shirodkar to make chhaiya chhaiya 2 with her after rejecting her chhaiya chhaiya because of weight says felt very guilty nsp