गेल्या अनेक दिवसांपासून शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट रिलीज होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. अशात चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढत आहे, त्यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात केली आहे. ॲडव्हान्स बुकिंगची आकडेवारी पाहता शाहिदचा २०२५ मधला पहिलाच चित्रपट रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरणार असं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, शाहिदच्या ‘देवा’ चित्रपटाने देशभरातील ६,६७३ शोमध्ये २३,०१३ तिकिटांची व्रिकी केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत या चित्रपटाने ५५.४३ लाख रुपयांची कमाई ॲडव्हान्स बुकिंगमधून केली आहे. या आकडेवारीत ब्लॉक सीट वगळण्यात आले आहेत. ब्लॉक सीटचाही विचार केला तर ॲडव्हान्स बुकिंगच्या कमाईची आकडेवारी थेट १.१७ कोटींपर्यंत पोहचते.

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोणत्या राज्यातून किती कमाई झाली याची माहिती जाणून घेऊ. दिल्लीमध्ये १८.९६ लाख रुपये ‘देवा’ने कमावले आहेत, तर महाराष्ट्रात १२.९८ लाख रुपयांची कमाई केली आहे. कर्नाटकमध्ये ७.१७ लाख रुपये, गुजरातमध्ये १५.१७ लाख रुपये ॲडव्हान्स बुकिंगची कमाई झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये ॲडव्हान्स बुकिंगवर ‘देवा’ने ९.५९ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, ॲडव्हान्स बुकिंग अशा पद्धतीने असल्यास चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ४ ते ५ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शाहिद कपूर अभिनीत आणि रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित ‘देवा’ चित्रपटाचं बजेट ८५ कोटी रुपये आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट भरपूर कमाई करणार असं दिसत आहे. शाहिद कपूर सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे.

दरम्यान, बुधवारी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात केल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा आणखी एक टीझर शेअर केला, ज्यामध्ये सुरुवातीला पोलिस एका ठिकाणी श्वानांसह तपास करत आहेत, मात्र जमिनीवर सर्वत्र मिरची पावडर असल्याने श्वान येथे अपयशी ठरतात. पुढे शाहिद आक्रमक अंदाजात गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसतो आहे.

‘देवा’ चित्रपटामध्ये शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासह पूजा हेगडे चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगला दमदार ओपनिंग केली असली तरी शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाला अक्षय कुमारच्या ‘स्काई फोर्सची’ तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid kapoor deva movie advance booking day 1 collection opens with rs 55 43 lakh rsj