मध्यंतरी हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि अभिनेत्री अंबर हर्ड हे दोघेही चांगलेच चर्चेत होते. या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा खरंतर बरीच वर्षं रंगत होत्या. पण नुकत्याच त्यांच्या घटस्फोटाच्या लाईव्ह खटल्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. या सुनावणीदरम्यान सोशल मीडियावर बरंच काही बोललं, लिहिलं गेलं. या खटल्यात बहुतांश जनता ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. सोशल मीडियावर अंबर हर्डला चांगलंच ट्रोल केलं जात होतं. जॉनीने या खटल्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला आणि अंबरला एक मोठी मानहानीची रक्कम जॉनीला देण्याचे कोर्टाने आदेश दिले. नंतर जॉनीने ते पैसे मला नकोत असं म्हणत लोकांची मनं जिंकली. आता हाच जॉनी डेप पुन्हा चर्चेत आहे, पण एका वेगळ्या कारणासाठी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तब्बल २५ वर्षांनी जॉनी पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात उतरणार आहे. १९९७ साली आलेल्या ‘द ब्रेव्ह’ या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉनीने केलं होतं. आता तब्बल २५ वर्षांनंतर जॉनी इटालियन चित्रकार आणि मूर्तिकार अमेडेव मोडीलियानी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. एका अमेरिकन नाटकावर हा सिनेमा बेतलेला असून सुप्रसिद्ध अभिनेता अल पचीनो यांच्यासोबत जॉनी डेप या सिनेमाची निर्मिती करणार आहे. जॉनी डेप म्हणतो, “मोडीलियानी यांचं जीवन चित्रपटाच्या रूपात मांडण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. त्यांचा प्रवास खूप खडतर होता आणि विश्वातल्या प्रत्येक माणसासाठी त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल.”

विश्लेषण : ऑस्कर अकादमीने ५० वर्षांनंतर कोणाची मागितली माफी? कारण काय?

मोडीलियानी कोण होते?

इटलीमध्ये जन्म घेतलेल्या मोडीलियानी यांनी बहुतांशकरून पॅरिसमध्येच काम केलं आहे. २० व्या शतकातील एक अद्वितीय चित्रकार आणि मूर्तिकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांची काही विशिष्ट शैलीतली पोर्ट्रेट्स आणि काही नग्न चित्रं यासाठी ते प्रसिद्ध आहेत. १९०४ ते १९१४ या काळात त्यांनी त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती घडवण्यात झोकून दिलं.

एका सुशिक्षित ज्यू कुटुंबात मोडीलियानी यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना बऱ्याच शारीरिक व्याधी होत्या. वयाच्या ११ व्या वर्षीच त्यांना फुफ्फुसाचा आजार जडला, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास व्हायचा. त्यानंतर काही वर्षांनी टायफॉइडने त्यांना ग्रासलं आणि मग कालांतराने टीबीसारख्या महाभयंकर आजाराने ते पुरते खचले. यामुळेच वयाच्या केवळ ३५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

लहान असताना जेव्हा ते टायफॉइडने अंथरूणात पडून होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईकडे फ्लोरेंसमधील ‘Uffizi Gallery art museum’ या लोकप्रिय ठिकाणी पेंटिंग्स बघण्यासाठी घेऊन जायचा हट्ट केला. साहित्य आणि कलाक्षेत्रात मोडीलियानी यांना रुचि आहे हे त्यांच्या आईने हेरलं आणि नंतर त्यांना Guglielmo Micheli या प्रसिद्ध इटालियन चित्रकाराकडे शिकण्यासाठी पाठवलं. त्यांच्याकडेच मोडीलियानी चित्रकलेतल्या landscape, portraiture, still life, and nude paintings अशा वेगवेगळ्या प्रकारात प्राविण्य मिळवलं.

१९०६ मध्ये मोडीलियानी यांनी इटली सोडलं आणि ते पॅरिसमध्ये स्थायिक झाले. इथे येताच ते पाब्लो पिकासो, पियरे-ऑगस्ट रेनोइर, ज्योर्जिओ डी चिरिको, आंद्रे डेरेन अशा मातब्बर कलाकारांच्या संपर्कात आले. मोडीलियानी यांनी काढलेल्या कित्येक नग्न चित्रांचं एक एक्झिबिशन पॅरिसमध्ये १९१७ मध्ये भरवण्यातआलं होतं. लोकांनी त्यांच्या या पेंटिंग्सवर प्रचंड टीका केली. तसेच त्यांना असभ्य असं बिरुदही चिकटवण्यात आलं. त्यांची ही पेंटिंग्स बघण्यासाठी लाखो लोकांनी तेव्हा गर्दी केली होती. त्यावेळच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे एक्झिबिशन बंद करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. २०१८ मध्ये म्हणजे तब्बल १०० वर्षांनंतर त्यांचं एक चित्र लिलावात १५७ मिलियन डॉलर्स इतक्या किंमतीला विकलं गेलं.

विश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान? मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या

२०२३ च्या हिवाळ्यात युरोपमध्ये जॉनी डेपच्या या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. चित्रपटात आणखीन कोण कलाकार दिसणार आहेत, याबाबत अजून काहीच स्पष्ट झालेलं नाही. जॉनी डेपसाठी हा त्याच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained johnny depp making film on italian painter amedeo modigliani avn
First published on: 19-08-2022 at 19:36 IST