‘हर हर महादेव’ अशी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे यांनी दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची भेट घेतली. यावेळी नागार्जुन यांच्या हस्ते तेलुगू चित्रपटातील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
‘हर हर महादेव’या चित्रपटाची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचे लूक समोर आले आहेत. त्यानंतर आता या चित्रपटाचे तेलुगू भाषेतील पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेते नागार्जुन यांनी हे पोस्टर प्रदर्शित केले आहेत. त्याने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळीचे काही फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण
सुबोध भावे काय म्हणाला?
“आज “हर हर महादेव ” चित्रपट सर्वदूर पोहोचवण्याच्या निमित्ताने, हैद्राबाद येथे तेलगू सुपरस्टार नागार्जुन सर यांची भेट घेतली. त्यांच्या हस्ते चित्रपटाचं तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आलं.
समस्त तेलगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले. ते स्वतः छत्रपतींच्या चरीत्राने प्रभावित झाल्याचं त्यांनी सांगितलं. “हर हर महादेव” च्या संपूर्ण संघाच्या वतीने आम्ही त्यांना सिंहासनारूढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली.
मराठी चित्रपट सर्वदूर नेण्याच्या प्रयत्नाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच “हर हर महादेव” चित्रपट तेलगू भाषेत पाहणार असल्याचं सांगितलं. नागार्जुन सर आपले आमच्या तमाम शिव – भक्तांतर्फे मनापासून आभार मानतो. हर हर महादेव”, अशी पोस्ट सुबोध भावे यांनी केली आहे.
दरम्यान हा चित्रपट अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आहे. या चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकार झळकणार आहेत.