‘बंदूक कमजोर लोग चलाते हैं, समझदार लोग सिर्फ दिमाग चलाते हैं।’ बिहारच्या पुरुषप्रधान राजकीय जगात स्वत:चं स्थान निर्माण करू पाहणाऱ्या राणी भारतीची ही गोष्ट. नवऱ्याची हत्या केल्याच्या संशयावरून तिची रवानगी तुरुंगात करण्यात येते. यानंतर ही राणी अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण करते. चौथी नापास असलेली एक सर्वसामान्य स्त्री राजकारणात एवढी मोठी उलाढाल करेल याची कल्पना कोणीही केली नसेल. ‘चौथी फैल थे तो नाम मे दम कर दिया था, अब क्या होगा हमनें तो १२ वीं पास कर ली है।’ असं विरोधकांना ठासून सांगणाऱ्या राणीची निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी सतत धडपड सुरू असते. अशी ही हुमा कुरेशीचे दमदार संवाद, न्याय हक्कासाठी झगडणारी स्त्री अन् बिहारच्या राजकारणाभोवती फिरणारी सीरिज म्हणजेच ‘महाराणी ३’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराणी’चा तिसरा भाग ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक सौरभ भावे यांनी केलं आहे. या सीरिजच्या रुपाने सौरभ यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांचं पहिलं पाऊल टाकलं. याआधी त्यांनी ‘हापूस’, ‘ताऱ्यांचे बेट’, ‘हवाईजादा’, ‘उनाड’ या चित्रपटांसाठी लेखक म्हणून जबाबादारी सांभाळली होती. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘महाराणी’च्या जगात दिग्दर्शक म्हणून केलेलं काम, हिंदी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव अन् सध्याचं ओटीटीचं जग याबाबत आपलं मत मांडलं आहे.

हेही वाचा : आलिया भट्ट : नेपोटिझमचा ठपका पुसून ट्रोलर्सना हसतमुखाने सामोरी जाणारी बहुरंगी अभिनेत्री

‘महाराणी ३’ या राजकारणावर भाष्य करणाऱ्या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शनाची सुरुवात करावी असं का वाटलं?

‘महाराणी’ सीरिजचा हा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांचं दिग्दर्शन अनुक्रमे करण शर्मा आणि रविंद्र गौतम यांनी केलं आहे आणि तिसऱ्या सीझनची जबाबदारी सुभाष कपूर सरांनी मला दिली. त्यामुळे यासाठी सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आधीचे दोन भाग जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले तेव्हा माझं आणि सुभाषजींचं नेहमी भेटणं-बोलणं व्हायचं. या सीरिजच्या लेखकांना मी ओळखत होतो आणि खूप चांगला नाही पण, हुमाला मी एक-दोनवेळा आधीच भेटलो होतो. त्यामुळे मला बिहारचं जग माहीत नसलं तरीही पहिल्या दोन सीझनमध्ये हे बिहारचं जग निर्माण करणाऱ्यांचं एक वेगळं जग मला माहिती होतं. यात मला संपूर्ण टीमचं सहकार्य लाभलं. बिहारची संस्कृती, तेथील परंपरा आणि राजकारण या सगळ्या गोष्टी मी टीमकडून आधीच समजून घेतल्यामुळे प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी सोप्या गेल्या.

‘महाराणी’ सेटवरची मराठमोळी बांधिलकी

‘महाराणी’च्या सेटवर आम्ही तीन जण मराठी होतो. स्वत: मी, अनुजा साठे आणि आमचा DOP कॅमेरामन अमोघ देशपांडे. आम्ही तिघे ‘महाराणी’च्या सेटवर कधी-कधी अचानक मराठी बोलायचो. त्यावेळी सुभाष सर असले की ते नेहमी आम्हाला म्हणायचे मी ‘महाराणी’ बनवतोय खरं पण, हे तिघे कोपऱ्यात एक वेगळी ‘महाराणी’ बनवत आहेत. असे बरेच मजेशीर किस्से या सेटवर घडले आहेत.

हेही वाचा : ऋतुजा बागवे : रंगभूमीवर रमणाऱ्या ‘अनन्या’ला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार

बॉलीवूडकरांबरोबर विशेषत: हुमा कुरेशीबरोबर काम करण्याचा अनुभव…

हुमाबरोबर काम करण्याचा अनुभव खूप सुंदर आणि छान होता. आधीचे दोन सीझन यशस्वी झाल्याने यातील बरेच कलाकार, क्रू मेंबर्स सारखेच होते. त्यामुळे खरं सांगायचं झालं, तर त्यांच्या जगात मी नवीन होतो. पण, या सगळ्यांनी मला थोड्याच दिवसांत आपलंसं करून घेतलं हे मुळात त्यांचं श्रेय आहे. सुरुवातीला मला प्रचंड दडपण आलं होतं. कारण, २५० माणसांच्या क्रूमध्ये जेव्हा ५ लोक नवीन येतात तेव्हा त्या ५ जणांना एका टीममध्ये नव्याने सामावून घेण्यात खूप वेळ जातो. आम्ही नवीन आलोय ही भावना त्या सगळ्यांनी आमच्या मनात केव्हाच येऊ दिली नाही. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात सगळं शूटिंग पार पडलं होतं.

हुमा कुरेशीच्या भूमिकेबद्दल…

पहिल्या दोन सीझनमुळे प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनात आधीच निर्माण झाली होती. त्यामुळे तिसऱ्या भागात त्यात काही विशेष बदल करण्यात आला नाही. सीरिज प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी हुमाची भूमिका कोणत्यातरी महिला राजकारण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला हे माझ्याही वाचनात आलं होतं. पण, ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. एखादा लेखक जेव्हा कथा लिहितो तेव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्या कलाकृतीमध्ये येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे तिच्या भूमिकेशी संबंधित असू शकतात. पण, सगळ्याच नाही. याशिवाय तिसऱ्या भागात राणी या पात्राच्या वेशभूषेचा देखील सखोल अभ्यास केल्याचं सौरभ यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत सांगितलं होतं. तुरुंगात असताना आणि पुढे तिकडून बाहेर पडताना राणीच्या साड्या राखाडी आणि काळ्या शेड्सच्या दाखवण्यात आल्या आहेत. स्क्रीनवर बॅकग्राऊंड रंग सुद्धा तुम्हाला तसाच दिसेल. परंतु, जसजशी ती राजकारणात बाजी पालटणार तसे तिच्या जगात विविध रंग भरले जातील.

गेल्या काही वर्षात ओटीटीवर बिहार केंद्रीत सीरिज येण्याचं कारण काय?

अनेक लोक युपी-बिहारला एक समजतात पण, तसं नाहीये. अलीकडच्या काळात ओटीटीवर प्रत्येक भागातील सामग्री उपलब्ध आहे. ‘मिर्झापूर’, ‘कोटा फॅक्टरी’, ‘महाराणी’ असो किंवा प्रिया बापटची ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ अशा सगळ्या प्रकारच्या सीरिज अलीकडच्या काळाच बनवल्या जात आहेत असं मला वाटतं. याशिवाय ज्या भागात प्रेक्षकवर्ग सर्वाधिक असतो तिकडच्या कॉन्टेन्टवर मोठ्या प्रमाणात भर दिली जाते. ओटीटी सब्सस्क्रिप्शन आणि लोकसंख्या यावर हे गणित आधारलं आहे. उदाहरणार्थ प्रत्येक ओटीटी चॅनेलला आपले प्रेक्षक कोणत्या भागात जास्त प्रमाणात आहेत याची संपूर्ण कल्पना असते. कोणत्या राज्याचा प्रेक्षकवर्ग सर्वात मोठा आहे आणि किती प्रेक्षकांनी शो पाहिला या अनुषंगाने निर्णय घेतले जातात.

हेही वाचा : आशुतोष गोवारीकर : ऑस्करवारी करणारा ‘लगान’ ते काळजाला भिडणारा ‘स्वदेस’! भारतीय सिनेमाला इतिहासाची जोड देणारा मराठमोळा दिग्दर्शक

हिंदीसारखा कॉन्टेन्ट मराठीत केव्हा येणार…

आपण याआधी मराठी पार्श्वभूमी असलेली ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ हिंदीत पाहिली. हिंदी प्रेक्षकांचा या सीरिजला तुफान प्रतिसाद मिळाला होता. ओटीटी वाहिन्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या वेगळ्या धाटणीच्या सीरिज मराठीत केल्या पाहिजे. एकदा सुरुवात झाली की नक्कीच प्रेक्षकांना विविध विषयांवर आधारित सीरिज पाहायला मिळतील. भविष्यात संधी मिळाली तर नक्कीच मला मराठीत एखाद्या राजकीय विषयावर आधारित सीरिजचं दिग्दर्शन करायला आवडेल. याशिवाय गुडलक सारखा एखादा शो मला मराठीत करायला नक्की आवडेल. कारण, त्या सीरिजमध्ये एक वेगळा गोडवा आहे जो प्रेक्षकांना नक्कीच कनेक्ट होईल.

दरम्यान, महाराणीच्या तिसऱ्या भागात हुमा कुरेशीसह विनित कुमार, प्रमोद पाठक, अमिक सियाल, अनुजा साठे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. नवीन कुमार आणि राणीची भारतीची राजकीय रॅली, हक्कासाठी लढाई ते दमदार भाषण या गोष्टी सीरिजमध्ये लक्षवेधी ठरतात.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi starrer maharani 3 ott series directed by marathi director saurabh bhave sva 00
Show comments