गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही लोकप्रिय मालिका आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. १६, जूनला महाअंतिम भागाने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा गोड शेवट होणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक गेली दोन वर्ष आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर पाहायला मिळणार आहे. अशातच स्वरा आणि मल्हाराने मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवट गोड पदार्थ केल्याचं समोर आलं आहे. दोघांनी सेटवर संपूर्ण मालिकेच्या टीमसाठी खास आमरसाचा बेत केला होता. याचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ आणि मालिकेच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, तेजस्विनी लोणारी, अवनी तायवाडे, अवनी जोशी, दीप्ती जोशी, उमेश बने, पल्लवी वैद्य, शैलेश दातार अशी तगडी कलाकार मंडळी असलेली ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका २ मे २०२० पासून सुरू झाली होती. संगीतावर नितांत प्रेम असणाऱ्या बाप-लेकीची ही कथा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली. तसंच मालिकेतील स्वरा, मल्हार, वैदही, मोनिका, पिहू, निरंजन, क्षमा, विजय, विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं. यादरम्यान मालिकेत बऱ्याच इतर कलाकारांच्या एन्ट्री झाल्या. त्यामधील उषा नाईक, हार्दिक जोशी व अभिजीत केळकर यांनी साकारलेली पात्र चांगलीच गाजली. अशी ही लोकप्रिय कलाकारांची लोकप्रिय मालिका काही तासांत प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा – अशोक सराफ यांना सात तास बसवलं होतं पोलीस ठाण्यात! स्वत: सांगितला धमाल किस्सा, वाचा

मालिकेतील मोनिकाच्या पापांचा घडा भरला असून ती आंधळी असल्याचं नाटक मल्हारसमोर उघड झालं आहे. तसंच वैदहीचा खूनही तिनं केल्याचं सत्य मल्हारसमोर आलं आहे. त्यामुळे आता मालिकेचा शेवट गोड होणार आहे. प्रेक्षक गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण शेवटी दाखवण्यात येणार आहे. अखेर खऱ्या बाप-लेकीची म्हणजेच मल्हार-स्वराची भेट महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे. मालिकेच चित्रीकरण काही दिवसांपूर्वीचं संपलं असून या शेवटच्या दिवशी मल्हार व स्वराने स्वतःच्या हाताने आमरस करून संपूर्ण टीमचं तोंड गोड केलं.

मल्हारने खास स्वराला आमरस कसा बनवायचा शिकवला. त्यानंतर सर्वांनी मल्हार व स्वराने बनवलेल्या आमरसावर चांगलाच ताव मारला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – ऐश्वर्या-अविनाश नारकरांच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार

दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेची जागा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ नवी मालिका घेणार आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली ही नवी मालिका १७ जूनपासून रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.