ऐश्वर्या व अविनाश नारकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या कामाव्यतिरिक्त दोघंही सोशल मीडियावर भन्नाट रील्स बनवून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यांचे डान्स व्हिडीओ सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतात. परंतु, अनेकदा हे व्हिडीओ शेअर केल्यावर नारकर जोडप्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये आपली बाजू स्पष्ट केली आहे.

ऐश्वर्या नारकर सांगतात, “मी पहिल्यांदाच हे अशाप्रकारे इन्स्टाग्राम लाइव्ह करतेय. खरंतर आम्ही दोघंही मुंबईपासून दूर जरा शांत ठिकाणी वेळ घालवण्यासाठी आलो आहोत. अनेक जणांना आम्ही आदर्श जोडी वाटतो ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण, आम्हाला बरंच ट्रोल केलं जातं. विशेषत: युट्यूबर ट्रोलिंगच्या कमेंट्स यायच्या. त्यामुळे युट्यूब मी कमेंट्स सेक्शन बंद ठेवलेलं आहे. कारण, मला असं वाटतं की, प्रेक्षकांची आवड आणि नावड हेच महत्त्वाचं आहे. त्या अचकट विचकट कमेंट्स वाचण्यापेक्षा त्या न वाचलेल्या बऱ्या असतात.”

हेही वाचा : Video: वडिलांच्या निधनामुळे घेतला ब्रेक, आता दमदार कमबॅकसाठी गश्मीर महाजनी सज्ज, पाहा नव्या शोचा जबरदस्त टीझर

ऐश्वर्या नारकर पुढे सांगतात, “अविला खरंतर डान्स करायला खूप आवडतं. त्याला प्रत्येक क्षणाला आनंदाने जगायला आवडतं. आम्ही आमच्या आनंदासाठी रील्स बनवतो. पण, तुमचं वय काय तुम्ही करताय काय? अशा कमेंट्स लिहून आम्हाला ट्रोल काही लोक करतात. पण, आपलं आयुष्य हे एकदाच मिळतं. त्यामुळे वयाचं भान ठेवून उपयोग नाही. आपण आयुष्य आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने जगलं पाहिजे. त्यामुळे हे शोभतं का तुम्हाला, तरुणपणी या गोष्टी करायच्या असं प्लीज मला म्हणू नका कारण, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जे करावंसं वाटतं ते करता आलं पाहिजे. मी खरंच भाग्यवान आहे कारण, अविनाशचे सुद्धा असेच विचार आहेत आणि असं एकमेकांना पुरक आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे.”

हेही वाचा : “नाहीतर याला सोडून मला जेलमध्ये घालतील”, पुण्यातील पोर्शे कार अपघाताबद्दल मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला…

“अनेकदा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेबद्दल सुद्धा कमेंट्स येतात. टेलिव्हिजनच्या एका मालिकेद्वारे जवळपास शंभर एक कुटुंब पोसली जातात. ती एक इंडस्ट्री आहे त्यामुळे मालिका जास्तीत जास्त चालली, तर अनेक कुटुंबाना पैसे मिळतात. सगळ्याच मालिकांमध्ये काही दिवसांनी एक असा स्थिरपणा येतो. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट तातडीने बंद व्हावा वगैरे असं म्हणता येत नाही. अनेकदा प्रेक्षकांना खरंच कंटाळा येतो हे मी समजू शकते. पण, अशावेळी चॅनेलला आकडेवारी टीआरपीमुळे कळते. तुम्ही कलाकारांच्या पेजवर सतत कमेंट्स करत राहिलात तर मी सांगते, आमच्या हातात काहीच नसतं. स्क्रीनप्ले, स्टोरी या सगळ्या गोष्टी चॅनेलकडून ठरवल्या जातात. आम्ही नंतर आमचं काम करतो. त्यामुळे सतत अशा मालिकेबद्दल कमेंट्स येतात तेव्हा आम्ही तरी त्यावर काय रिप्लाय देणार? अशावेळी तुम्ही वाहिनीच्या पेजवर कमेंट केल्या तर फरक पडू शकतो” असं ऐश्वर्या नारकर यांनी स्पष्ट केलं.