Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची विविध कारणांमुळे सतत चर्चा रंगलेली दिसते. गेल्या आठवड्याच बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडलेल्या पाहायला मिळाल्या. आर्याने भांडणात निक्कीच्या कानशिलात लगावल्याने तिला शिक्षा म्हणून निष्कासित करण्यात आले आणि वैभव चव्हाण हा घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाला होता. त्याला कमी मतांमुळे घराचा निरोप घ्यावा लागला आहे. आता घरातून बाहेर पडल्यावर त्याने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने सूरज चव्हाणविषयी वक्तव्य केले आहे.
सूरज चव्हाणला देणार पाठिंबा
वैभव चव्हाणने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सूरज चव्हाणविषयी वक्तव्य केले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात असलेल्या कोणत्या एका व्यक्तीला पाठिंबा देशील? यावर बोलताना त्याने म्हटले, “खरे सांगायचे, तर त्या व्यक्तीचा आणि माझा बॉण्ड लोकांना माहीत नाही. सूरज ही अशी व्यक्ती आहे की, ज्याला मी आधीपासून ओळखतो. त्याचं गाव माझ्या गावाशेजारी आहे. त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनला मी पाहुणा म्हणून गेलेलो आहे, त्याला भेटलेलो आहे. आमचं चव्हाण-चव्हाण हे जे बॉण्ड आहे, ते आधीपासून आहे.”
पुढे बोलताना वैभव म्हणतो, “आमच्यात जी भांडणे झाली, ती तेवढ्यापुरती होती. त्याला राग आला आणि मलाही राग आला; पण ते तेवढ्यापुरतंच होतं. नंतर आम्ही जिम एकत्र करायचो. कपडे शेअर करायचो. माझ्या हुडीज वगैरे मी त्याला दिलेल्या आहेत. त्याला सांगायचो की, असं नाही, असं कर. त्याची दोन वेळा दाढीपण करून दिली आहे. मला माहीत नाही, हे दिसतंय नाही दिसतंय; पण बाहेरही त्याचं आणि माझं नातं चांगलं होतं.”
हेही वाचा: “…त्याच्यामुळे मी बाहेर आहे”, एलिमिनेट झाल्यानंतर वैभव चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला…
सूरजच्या स्वभावाबद्दल वैभव म्हणतो, “मला मनापासून वाटतं की, सूरज खूप साधा, सरळ माणूस आहे. त्याला जे पटतंय, तेच तो करतोय. असं कोणाच्या ऐकण्यावरती तो वागत नाहीए. पण बी ग्रुपमध्ये ज्यावेळी गोष्टी बोलल्या जात होत्या, त्यावेळी तो ऐकतो कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. कितीही नाही म्हटलं तरी ते मनात राहतं आणि मला माहीत नाही की, माझ्याबद्दल त्या ग्रुपमध्ये काय बोललं गेलंय. त्याचा थोडाफार प्रभाव असू शकतो.”
“सूरजला मी पाठिंबा देईन. कारण- तो माझ्या गावचा आहे. मला तो माहितेय की, तो पहिल्यापासून कसा आहे. तो कोणत्याच गोष्टी खोट्या करत नाहीए. तो पहिल्यांदाच या शोमध्ये आलाय आणि मीपण पहिल्यांदाच अशा शोमध्ये आलेलो होतो. मला ज्या गोष्टी कळल्या नाहीत, त्या त्याला कळल्या म्हणजे तो खूप स्मार्ट आहे. त्याच्याबरोबर जी भांडणं झाली, ती वैयक्तिक नव्हती. येताना मी त्याला मिठी मारली आणि सांगितलं की, ट्रॉफी बारामतीत पाहिजे. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.