‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे डॉ. गिरीश ओक. ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचे वडील रत्नाकर दिनकर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
गिरीश ओक यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्यांनी वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची दु:खद बातमी सांगितली आहे.
आणखी वाचा : Chandrayaan 3 : ‘India on the Moon’, मराठीसह हिंदी कलाकारांनी केलं इस्रोचं कौतुक, म्हणाले…
गिरीश ओक यांची पोस्ट
“काल माझे बाबा ती. रत्नाकर दिनकर ओक ह्यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृध्दत्वामुळे निधन झालं. प्रत्येक मुलाचे/मुलीचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात तसेच तेही माझे होतेच. माझ्यात ज्या काही थोड्याफार तथाकथित बऱ्या सवयी गोष्टी आहेत त्या त्यांच्यामुळेच. ते इलेक्ट्रिकल इंजीनीअर होते आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर ह्या पदावर ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही भ्रष्टाचार केला नाही.
ह्या व्यतिरिक्त त्यांना अनेक गोष्टी अवगत होत्या. त्यांना संस्कृत फ्रेंच जर्मन स्पॅनिश गुजराथी उर्दू इतक्या भाषा यायच्या ते शिवण काम आणि स्वयंपाक उत्तम करायचे कपड्यांना इस्त्री सायकल स्कूटर घड्याळं घरातल्या जवळ जवळ सगळ्याच उपयोगाच्या वस्तूंचं सर्विसींग दुरूस्ती तेच करायचे तेव्हा मी त्यांना असिस्ट करायचो त्यामुळे त्या गोष्टी मीही शिकलो. माझी आई गमतीनी म्हणायची ती,मी आणि बहीण ह्यांना नटबोल्ट नाहीत नाहीतर त्यांनी आम्हालाही उघडून आमचं सर्विसींग केलं असतं. अर्थात ते त्यांनी न उघडताच केलं. ते बासरी आणि माउथ ॲार्गन छान वाजवायचे ते त्यांनी मला शिकवायचा प्रयत्नही केला पण मीच कंटाळा केला.
रोज नियमीत सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणं मी त्यांच्यामुळेच शिकलो. अन्नाची पाण्याची विजेची नासाडी त्यांना अजिबात खपत नसे ह्या गोष्टींची किंमत मला त्यांच्यामुळेच कळली. काय काय आणि किती सांगू, आखीर बाप बाप होता है और बेटा बेटा. बाबा तूम्ही खूप सकारात्मक व्यासंगी आनंदी आयुष्य जगलात. तुम्ही खूप शांत संयमी होतात आणि अगदी तसेच जातानाही तुम्ही आम्हाला कोणालाही त्रास न देता शांतपणे गेलात. मला आणि सौ. पल्लवीला शेवटी तुमची सेवा करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. तुम्हाला सतत वेगवेगळ्या कामात व्यस्त असणं आवडायचं देव तुम्हाला तसंच व्यस्त ठेवो म्हणजे तुम्ही आनंदी रहाल. ती. बाबा शिरसाष्टांग नमस्कार”, असे गिरीश ओक यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : “आम्हाला उत आलाय का?” जितेंद्र जोशीचा अवधूत गुप्तेला प्रश्न, भर कार्यक्रमात म्हणाला “ही खुर्ची…”
दरम्यान गिरीश ओक यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात चीफ इंजीनीअर कार्यरत होते. ते १९८९ साली निवृत्त झाले. त्यांना संस्कृत, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, गुजराती, उर्दू इतक्या भाषा अवगत होत्या.