अभिनेत्री स्पृहा जोशीच्या नव्या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर स्पृहाची ‘सुख कळले’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत स्पृहाबरोबर अभिनेता सागर देशमुख प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. स्पृहा-सागर मिथिला-माधवच्या भूमिकेत दिसणार आहेत. २२ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या नव्या मालिकेचं तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेशी खास कनेक्शन आहे. ते काय आहे? जाणून घ्या..

‘कलर्स मराठी’च्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत स्पृहा, सागर व्यतिरिक्त अभिनेता सागर देशमुख, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, बालकलाकार मिमी खडसे, अभिनेता स्वप्नील परजणे, अभिनेत्री स्वाती देवल, बालकलाकार स्वराध्य देवल पाहायला मिळणार आहेत. २२ एप्रिलपासून रात्री ९ वाजता ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित झालं. “दु:खही आपुले दरवळले, सावलीत ऊन वितळले, फिरुनी, तुझ्यात बघता स्वतःस वाटले…’सुख कळले'”, हे शीर्षकगीत लोकप्रिय लेखिका, गीतकार अश्विनी शेंडे यांनी लिहिलं आहे. तसेच गायिका प्रियांका बर्वे व गायक अभय जोधपुरकर यांनी गायलं आहे. प्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं आहे.

हेही वाचा – मुग्धा वैशंपायन लवकरच श्रोत्यांसाठी घेऊन येतेय एक खास गोष्ट, पोस्ट करत म्हणाली, “मी स्वतः…”

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘सुख कळले’ या दोन्ही मालिकेचं काय खास कनेक्शन आहे? तर ‘सुख कळले’ या मालिकेचं शीर्षकगीत ज्यांनी लिहिलं आहे म्हणजे अश्विनी शेंडे यांचा संबंध ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेशी आहे. तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेच्या अश्विनी शेंडे लेखिका आहेत.

हेही वाचा – रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत

दरम्यान, अश्विनी शेंडे यांनी याआधी अनेक मालिकांचं पटकथा, संवाद लेखन केलं आहे. तसंच शीर्षकगीतही लिहिलं आहे. ‘कुलवधू’ या मालिकेचं शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं होतं. याशिवाय त्यांनी चित्रपटासाठी गाणी देखील लिहिली आहेत.