नागपूर / मुंबई : केंद्रीय यंत्रणांकडून अटक टाळायची असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य, शिवसेना नेते अनिल परब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील आरोपांच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाब टाकल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केला. त्यावर आपल्याकडे देशमुखांच्या ध्वनिचित्रफिती असून गरज पडल्यास त्या सार्वजनिक करेन, असा पलटवार फडणवीस यांनी केला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी मंगळवारी फडणवीसांनी शपथपत्रांसाठी देशमुखांवर दबाब टाकल्याचा आरोप केला होता. बुधवारी याला दुजोरा देताना देशमुखांनी संपूर्ण तपशीलच मांडला. ते म्हणाले, की तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी पाठवलेला एक माणूस चार शपथपत्रे घेऊन आला होता. पहिल्या शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितल्याचे नमुद होते. दुसऱ्यात आदित्य यांच्यावर दिशा सालीयन प्रकरणी गंभीर आरोप होते. तिसऱ्यात परब यांच्यावर आरोप होते तर चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी गुटखा व्यावसायिकांकडून वसुली करण्यास सांगितल्याचे नमुद होते.
हेही वाचा >>> विकासाची ‘गाडी’ रोखणाऱ्यांना प्रगतीची ‘बुलेट’ कशी दिसणार?अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला
देशमुखांच्या आरोपांना फडणवीस यांनी मुंबईत जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खोट्या प्रकरणात गुन्हे दाखल करून मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी देशमुख यांनी दबाव आणल्याचा गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. देशमुख सातत्याने आरोप करीत असूनही मी शांत आहे. मी कोणावर डूख ठेवून रहात नाही व कोणाच्या नादी लागत नाही. पण कोणी माझ्या नादी लागले, तर मात्र सोडत नाही,’’ अशा शब्दांत फडणवीस यांनी देशमुखांना आव्हान दिले. देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याबाबत काय बोलले आहेत, याच्या ध्वनिचित्रफिती त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी मला आणून दिल्या आहेत. गरज भासल्यास त्या मी सार्वजनिक करेन, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. त्यांचे सरकार असताना उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोज खोटे बोलून कोणी अपप्रचार (नॅरेटिव्ह) करीत असेल, तर आपण पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे फडणवीस म्हणाले. राजकीय व सार्वजनिक क्षेत्रात (इकोसिस्टीम) सुपारीबाज घुसले आहेत. त्यांच्या नादी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाम मानव का लागले, असा मला प्रश्न पडतो, असे फडणवीस म्हणाले.
शपथपत्रांवर स्वाक्षरी करावी व तसा जबाब तपास यंत्रणांना द्यावा… बदल्यात परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमधून सुटका होईल, असे (फडणवीसांनी पाठविलेल्या) व्यक्तीने सांगितले होते. मात्र मी नकार दिल्यामुळे १३ महिने तुरुंगात राहावे लागले. – अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
© The Indian Express (P) Ltd