मुंबईकरांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा; जनुकीय चाचणीच्या चौदाव्या फेरीचा निष्कर्ष

करोना विषाणुच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण मुंबईत ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे  करण्यात येत असून १४ व्या फेरीत मुंबईतील २३० नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

मुंबईकरांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा; जनुकीय चाचणीच्या चौदाव्या फेरीचा निष्कर्ष
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  करोना विषाणुच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण मुंबईत ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे  करण्यात येत असून १४ व्या फेरीत मुंबईतील २३० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकारातील आहेत. त्यामुळे या उपप्रकाराच्या विळख्यात मुंबईकर आहेत, हे स्पष्ट झाले.

२३० नमुन्यांमध्ये  १८ वर्षांपर्यंतच्या २० नमुन्यांचा समावेश होता. त्यापैकी, पाच नमुने हे ० ते ५ वर्षे वयोगटातील, पाच नमुने ६ ते १२  तर, १० नमुने १३ ते १८ वर्षे वयोगटातील होते. या रुग्णांमध्ये करोनाची गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. या २३० बाधितांपैकी, ७४ जणांनी करोना प्रतिबंधात्मक लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. पैकी १९ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील तिघांना अतिदक्षता विभागात उपचारांची गरज होती. दरम्यान, जनुकीय सूत्र निर्धारणामुळे उपचारांची नेमकी दिशा निश्चित करता येणार आहे.

उपचाराची दिशा ठरवणे सोपे..

करोना विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रकारांमधील फरक ओळखता येतो. त्या अनुषंगाने उपचारांची नेमकी दिशा निश्चित करता येते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार चौदाव्या फेरीच्या चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत ६८३ जणांना संसर्ग

मुंबई : मुंबईतील बुधवारी ८५२ रुग्ण आढळले होते. गुरुवारी मात्र ही संख्या काहीशी कमी झाली. गुरुवारी ६८३ रुग्ण आढळले. तर, ४०९ रुग्ण बरे झाले. या एकाच दिवशी ८२४७ चाचण्या झाल्या.  रुग्ण वाढीचा दर ०.०३९ टक्क्यांवर गेला आहे. ६८३ पैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे असलेल्या ४४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुंबईत एकही चाळ किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित नाही.

ठाणे जिल्ह्यात २१२ नवे बाधित 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात गुरुवारी २१२ करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी नवी मुंबई ७८, ठाणे ७३, कल्याण डोंबिवली २४, मीरा भाईंदर २३, उल्हासनगर सात, भिवंडी पाच आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात दोन रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार २०६ आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omicron problem conclusion fourteenth round genetic testing ysh

Next Story
मेट्रो-३ पुढील वर्षी सेवेत; आरे कारशेडचे काम जुलै २०२३ मध्ये पूर्णत्वास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी