“शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की…”; शरद पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंची टीका

तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय, असेही राज ठाकरे म्हणाले

Referring to Sharad Pawar Raj Thackeray criticizes Shiv Sena

शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. याबाबत पुण्यातील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“मागच्या सभेत मी म्हणालो होतो की पंतप्रधानांना विनंती आहे की लवकरात लवकर समान नागरी कायदा आणावा. देशाच्या लोकसंख्या नियंत्रणासाठी अजून एक कायदा आणावा आणि तिसरी विनंती म्हणजे औरंगाबादचं लवकरात लवकर संभाजी नगर हे नाव करुन टाका. यांचं राजकारण एकदा मोडीतच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदु-मुसलमान मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदुंविरोधात बोलत राहिली पाहिजे. ज्यातून यांची रोजीरोटी चालेल. यांच्या लक्षात आलं नाही की आपण एक राक्षस वाढवतोय. म्हणता म्हणता यांच्या राजकारणात एमआयएमचा खासदार झाला. निजामाच्या औलादी महाराष्ट्रात वळवळायला लागल्या. यांना भुसभुशीत जमीन यांनीच करून दिली,” असे राज ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेचा तिथला खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवतात आणि आम्हाला लाज वाटत नाही. सत्ताधारीच असे बसले आहेत. आता आमच्या शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटत असेल, तर यापलीकडे काय बोलायचं? अफजलखान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? यांचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी तुम्हाला गृहीत धरून हे चालणार. काल शिवसेनेतलं कुणी बोललं की महाविकास आघाडी सरकार हे पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार सांगतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे स्वःत सत्तेत इतके मश्गूल आहेत की यांना कशाची पर्वा नाहीये. कारण महाराष्ट्रातली जनता बेपर्वा वागते. निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या गोष्टी विसरायच्या आणि भलत्याच गोष्टीवर मतदान करून मोकळं व्हायचं. त्यांचा आम्ही काही केलं तरी निवडून येणार हा समज दूर करत नाहीत तोपर्यंत चांगले दिवस येणारच नाहीत,” असे राज ठाकरेंनी म्हटले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Referring to sharad pawar raj thackeray criticizes shiv sena abn

Next Story
“दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे, त्याला पकडून घेऊन या”; मलिकांबाबत कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणावर राऊतांची प्रतिक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी