मुंबई : आपला पहिलाच दसरा मेळावा गाजविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मोठय़ा प्रमाणात राज्यभरातून मुंबईकडे येणाऱ्या आणि परतीला जाणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण केल्यामुळे एसटी महामंडळाला शिंदेंच्या ‘कार्यकर्ते प्रवासी सेवे’पोटी तब्बल दहा कोटी रुपये मिळाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात होत आहे. मेळाव्यांना गर्दी व्हावी यासाठी बरीच चढाओढ सुरू आहे.

राज्यातील एसटीच्या वेगवेगळय़ा विभागातील कार्यालयात जमा झालेल्या या रक्कमेची मोजदाद महामंडळाकडून  करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागातून ३५० एसटी गाडय़ांचे आरक्षण झाले असून नाशिकमध्ये २८०, धुळे १५०, जळगाव २५०, रायगडमधून २०० आणि ठाणे विभागातून १८५ गाडय़ांचे आरक्षण झाल्याचे सांगण्यात आले. लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी मंगळवारपासून मुंबईसाठी रवाना झाल्या असून कमी अंतराच्या एसटी बुधवारी पहाटे निघणार आहेत. या १,८०० एसटी गाडय़ांच्या आरक्षणामागे सुमारे दहा कोटी रुपये रक्कम महामंडळाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या जिल्ह्यात या गाडय़ांचे आरक्षण झाले आहे, तेथून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयांत रक्कम भरली आहे.

काय झाले? एखाद्या राजकीय मेळाव्यासाठी पहिल्यांदाच अशाप्रकारे सर्वाधिक गाडय़ांचे आरक्षण झाले असून त्यामुळे एसटीला या मोठय़ा आरक्षणातून विक्रमी उत्पन्न मिळाले असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली. सर्वाधिक गाडय़ा औरंगाबाद विभागात आरक्षित करण्यात आल्या असून तेथून ३५० गाडय़ा मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.

कानाकोपऱ्यातून..

शिंदे गटाकडून विविध विभागातून १,८०० गाडय़ांचे आरक्षण झाल्यानंतर मंगळवारपासून या गाडय़ा राज्यातील कानाकोपऱ्यातून मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde camp paid 10 crore and booked 350 msrtc bus for dussehra rally zws
First published on: 05-10-2022 at 03:23 IST