नागपुरातील कोळसा व्यापाऱ्याला मागितली १ कोटीची खंडणी; तीन पत्रकारांसह चौघांना अटक | A ransom of 1 crore was demanded from a coal trader in Nagpur adk 83 amy 95 | Loksatta

नागपुरातील कोळसा व्यापाऱ्याला मागितली १ कोटीची खंडणी; तीन पत्रकारांसह चौघांना अटक

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर १ कोटीच्या खंडणीची मागणी केली.

crime news
बहिणीची बदनामी केल्याच्या वादातून नागपुरात दोन गटात मारामारी (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर १ कोटीच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास वृत्तपत्राच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा >>>नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील कोळसा व्यापारी गुप्ता यांना गेल्या काही दिवसांपासून तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, वंश अग्रवाल, मध्यप्रदेशातील शिवनी येथील राष्ट्रभान डॉट इन या पोर्टलचा संजय बघेल, संजीत बघेल हे चौघेही एक कोटी रुपयांची खंडणी मागत होते. पीयूष आणि बघेल हे दोघेही गुप्ता यांच्याविषयी बदनामीकारक बातम्या प्रकाशित करीत होते. त्यामुळे गुप्ता यांनी दिवानी न्यायालयात बघेल बंधूंना खेचले होेते. न्यायालयाने दोघांनाही कोणतेही वृत्त प्रकाशित न करण्याच्या अटीवर सोडले होते. त्यानंतर चौघांनी गुप्ता यांना खंडणी मागण्याचा आणखी एक कट रचला. वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार याने गुप्ता यांना केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे विशेष कार्यसन अधिकारी (ओएसडी) यांच्या नावाने फोन केला. कोळसा व्यापारात काही बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करीत एक कोटीची खंडणी मागितली. आरोपींनी गुप्ता यांच्या पुतण्याची भेट घेऊन १० लाखांची मागणी केली. गुप्ता यांनी खंडणी देण्यास नकार देत नागपूर सायबर पोलिसांत तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तपास करीत आरोपी तोतया पत्रकार पीयूष पुरोहित, संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल यांना अटक केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:17 IST
Next Story
नागपूर : पैसे न दिल्याच्या रागातून पोटच्या मुलाने चिरला वृद्ध आईचा गळा