चंद्रपूर: “मेरा बूथ सबसे मजबूत” घोषणा देत बुथ अभियान राबविणारा भारतीय जनता पक्ष बुथ व्यवस्थापनात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील २ हजार ११८ मतदान केंद्रांपैकी केवळ २०० केंद्रांवर भाजप उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना अधिक मते आहेत. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना १९०० केंद्रांवर आघाडी आहे.

चंद्रपुरात भाजपाच्या दोन्ही माजी महापौर, महानगर अध्यक्ष, माजी महानगर अध्यक्षांच्या वार्डातील मतदान केंद्रावर मुनगंटीवारांना अपेक्षेपेक्षा खूप कमी मतदान झाले आहे. घुग्घुस, दुर्गापूर बल्लारपूर शहरासोबतच जिल्हा परिषद क्षेत्रातही कमी मतदान झाल्याने भाजप पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी प्रचार केला की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा – एसटी बसच्या प्रवासात सुट्टे पैसे नाही, या प्रणालीतून तिकीट काढणे शक्य

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने “मेरा बूथ सबसे मजबूत” अभियान प्रभावीपणे राबविले होते. भाजप उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात हे अभियान येथे राबविले गेले. आता निवडणुकीनंतर मुनगंटीवार यांना राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, वणी व आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते बघितली तर भाजपा पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत खरच काम केले का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ३८३ मतदान केंद्र आहेत. यापैकी केवळ ५२ केंद्रांवर मुनगंटीवार यांना आघाडी आहे. चंद्रपूर महापालिकेत भाजपाची साडेसात वर्ष सत्ता होती. या कालावधीत भाजपाच्या राखी कंचर्लावार दोन वेळा तर अंजली घोटेकर एक वेळा महापौर होत्या. मात्र या दोन्ही माजी महापौरांच्या प्रभागात मुनगंटीवार यांना मिळालेली मते कमी आहेत. साईबाबा व वडगांव प्रभागातील मतदान केंद्रावर मुनगंटीवार यांना अनुक्रमे २ हजार ९०० व व १ हजार ७९१ तर धानोरकर यांना २ हजार ८०० व २ हजार ४३१ मते मिळाली आहेत. माजी महापौर अंजली घोटेकर यांच्या शास्त्रीनगर प्रभागात मुनगंटीवार यांना २ हजार ८४८ तर धानोरकर यांना २ हजार ८५० मते मिळाली. तुकूम प्रभागात भाजपाचे नगरसेवक आहेत. मात्र तिथेही काँग्रेसने आघाडी मिळविली आहे. गंजवार्ड, भानापेठ वार्डातील मत केंद्रावरही मुनगंटीवार माघारले तर धानोरकर यांना मतांची आघाडी आहे. विठ्ठल मंदिर, बालाजी वार्ड व एकोरी प्रभागातील एक दोन मतदान केंद्र सोडले तर भाजपाला कुठेही आघाडी नाही.

घुटकाळा प्रभागात एका केंद्रावर धानोरकर यांना ७०० व मुनगंटीवार यांना केवळ २० मते आहेत. महानगर अध्यक्ष राहुल पावडे, माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या प्रभागातही भाजपला कमी मते पडली. नगीनाबाग, सिव्हील लाईन, जटपूरा गेट, पंचशिल वार्ड, येथेही भाजपा माघारली आहे. जिथे भाजपाचे नगरसेवक आहेत तिथेच मुनगंटीवार यांना कमी मतदान झाले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या घुग्घुस, नकोडा गावात भाजपा बरीच मागे आहे. बल्लारपूर विधानसभा संघात देखील हीच अवस्था आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील ३६१ मतदान केंद्रांपैकी केवळ ३० मतदान केंद्रांवर भाजपाला आघाडी तर काँग्रेसला ३३१ मतदान केंद्रावर आघाडी आहे.

हेही वाचा – उत्तर नागपुरात काँग्रेसचे मताधिक्य आणखी वाढले

दुर्गापूर, ऊर्जानगर, विसापूर, मूल, पोंभूर्णा येथे भाजपा बरीच मागे आहे. राजुरा विधान सभेतील ३३० मतदान केंद्रापैकी केवळ १४ केंद्रांवर भाजपला आघाडी असून ३१५ मतदान केंद्रांवर काँग्रेसला आघाडी आहे. राजुरा हा काँग्रेसचा गड असल्याने येथे काँग्रेसला आघाडी राहणार असल्याचे निश्चित होते. तसेच चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ३८३ मतदान केंद्रांपैकी भाजपला केवळ ५२ मतदान केंद्रांवर आघाडी असून काँग्रेसला तब्बल ३३१ केंद्रांवर आघाडी आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांपैकी १४ केंद्रांवर भाजपा समोर असून ३२५ मतदान केंद्रांवर काँग्रेस आघाडीवर आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदान केंद्रांपैकी २८ मतदान केंद्रांवर भाजपला आघाडी असून ३१० मतदान केंद्रांवर काँग्रेस वरचढ ठरली आहे. त्यामुळे भाजपाने केलेले बुथनिहाय नियोजन सपेशल अपयशी ठरल्याचे चित्र आहे.