नागपूर : राज्यात ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सक्रिय असून, जैसलमेर, कोटा, गुना, सागर, पेंद्रारोड, बालासोर ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. वायव्य मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.

हेही वाचा >>> शुभमंगल सावधान! २०२४ मध्ये ६६ विवाह मुहूर्त, जाणून घ्या एका क्लिकवर…

अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाडा देखील वाढला आहे. मात्र आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर : मुस्लीम बांधवांच्या ‘या’ निर्णयाचे कौतुक, गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद…

उत्तर अंदमान समुद्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची प्रणाली पूर्व -मध्य बंगालच्या उपसागरात मनारच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीपर्यत कायम आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत या भागात कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. राज्यातील पावसाची उघडीप आणखी दोन दिवस राहणार असून, गुरूवारपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने शुक्रवारपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस वाढण्याचे संकेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imd predicts moderate rain with thunder in konkan and central maharashtra rgc 76 zws