चंद्रपूर : धर्माच्या नावावर सर्वत्र राजकारणाची पोळी शेकली जात असताना चंद्रपूर जिल्ह्यात धार्मिक एकतेचे दर्शन बघायला मिळाले आहे. अनंत चतुर्दशी अर्थात गणपती विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही उत्सव २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने सामाजिक शांतता अबाधित राहावी. दोन्ही धर्मातील 'भाईचारा' टिकून राहावा, यासाठी चंद्रपुरातील मुस्लीम बांधवांनी एका बैठकीत गणेश विसर्जनानंतर २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादचा जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम समाजाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या डोक्यावरील मोठा ताण कमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गणपती उत्सवाची तयारी शिगेला पोहोचली आहे. १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. १० दिवस गणपती उत्सवात जातील. २८ तारखेला अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जाईल. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे. हेही वाचा - “शिंदे, फडणवीस आणि पवार या त्रिकुटाला घरी बसवा,” विद्यार्थ्यांचा संताप; अजित पवार असे काय बोलले की… अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी असल्याने बंदोबस्ताच्या दृष्टीने प्रशासनासमोरही मोठी अडचण निर्माण झाली असताना मुस्लीम बांधवांनी यातून काढलेल्या मार्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेश विसर्जनाला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये. तसेच आपलाही उत्सव तितक्याच आनंदात साजरा करता यावा म्हणून मुस्लीम समाजातील काही मंडळींनी प्रस्ताव मांडला. हेही वाचा - नागपूर : मोकाट कुत्रा अचानक दुचाकीसमोर येण्याचं निमित्त झालं अन क्षणात होत्याचं नव्हतं झालं… रविवारी रात्री दादमहल वॉर्डातील मस्जिद परातील सर्व पदाधिकारी आणि मस्जिदचे अध्यक्ष, सर्व मौलाना आणि समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेण्यात आली. ईद मिलाद समितीचे अध्यक्ष सोहेल रजा शेख, उपाध्यक्ष सादिक शेख, सचिव युसूफ कुरेशी यांच्यासह कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात गणपती विसर्जनानंतर २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादचा जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मुस्लीम बांधवांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे..