वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पूर्णवेळ हजेरी लावून एक अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलल्या जात आहे. विदर्भात त्यांच्या पक्षासाठी मिळालेली ही एकमेव जागा ते सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनाच पक्षात घेत त्यांनी उमेदवारी बहाल केली.

आज सभा झाल्यानंतर त्यांच्यासाठी भोजनाचे आयोजन माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याकडे करण्यात आले. या ठिकाणी काही नेत्यांना चर्चेसाठी बोलावून घेण्यात आले होते. शेखर शेंडे, चारुलता टोकस, प्रवीण हिवरे, सुधीर कोठारी, किशोर माथनकर, सुनील राऊत, हर्षवर्धन देशमुख व अन्य नेते होते. पवारांनी स्वतंत्रपणे सर्वांना ऐकून घेतले. सर्वानाच प्रचारात सहभागी करून घेतले पाहिजे. माझ्या मतदारसंघात मीच काय ते ठरविणार, अशी दादागिरी नको, असा सूर काहींनी रणजित कांबळे यांचे नाव न घेता काढला. प्रचारात आडकाठी केल्या जाते. साहित्य मिळत नाही. वारंवार हस्तक्षेप होतो. हे टाळले तर आपला विजय निश्चित आहे, अशी ग्वाही काही नेत्यांनी दिली. वर्ध्यात महाविकास आघाडीचा उमेदवार दमदार आहे. पण प्रचारात एकजूट दिसावी, अशी अपेक्षा या नेत्यांनी व्यक्त केली. त्यावर पवार यांनी अनिल देशमुख यांच्याकडे बघून यात लक्ष घाला, अशी सूचना केली.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

हेही वाचा – ‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

पवार यांचे आगमन हेच मुळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी झाल्याचे म्हटल्या जाते. कारण काळे यांना उमेदवारी दिली तेव्हा मूळचे राष्ट्रवादी नेते नाराज झाले होते. शेवटी त्यांना मुंबईत पाचरण करीत पवार यांनी त्यांची समजूत काढली. ते झाल्यावर त्याच बैठकीत काळे यांना बोलावून घेण्यात आले होते. सर्वांच्या उपस्थितीत मग काळे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश झाला. त्याला तीन दिवस लोटत नाही तोच पवार खुद्द वर्ध्यात आले. भोजनाच्या निमित्ताने भेटी घेत त्यांनी मते जाणून घेतली. तेव्हा नाराजीची बीजे त्यांना दिसून आली.