Premium

नाशिक :दसरा मेळाव्यातील शक्ती प्रदर्शनासाठी दोन्ही गटात स्पर्धा

शिंदे गटाच्या आगाऊ बस आरक्षणामुळे ठाकरे गटाची अडचण

UDDHAV-THACKERAY-AND-EKNATH-SHINDE-
( संग्रहित छायचित्र )

शिवसेनेतील फाटाफुटीनंतर मुंबईत शिंदे आणि ठाकरे गटाच्या स्वतंत्रपणे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी स्थानिक पातळीवरून दोन्ही गटांनी चांगलीच कंबर कसली आहे. शिंदे गटाने शहरासह वेगवेगळ्या तालुक्यातून ३३७ बस आणि ४२४ जीप, टेम्पो आदी वाहनांद्वारे समर्थकांना मुंबईत नेण्याचे नियोजन केले आहे. शिंदे गटाला शह देण्यासाठी ठाकरे गटाने सोमवारी बैठक घेत पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांवर गर्दी जमविण्याची जबाबदारी सोपविली. शहर, ग्रामीण भागातून हजारो शिवसैनिकांना मुंबईत नेले जाणार असल्याचे दावे होत आहे. शिंदे गटाने आधीच बसगाड्या आरक्षित केल्यामुळे ठाकरे गटाला आवश्यक तितक्या बसची उपलब्धता होण्यात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिकरोड येथे १४ लाखांचा गुटखा जप्त

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांतर्फे आयोजिलेला हा पहिलाच मेळावा आहे. जिल्ह्यात सेनेचे खासदार, दोन आमदार, एक माजी नगरसेवक आणि त्यांचे समर्थक वगळता संघटनात्मक पातळीवर अद्याप फारशी फाटाफूट झालेली नाही. मेळाव्यात गर्दी जमविण्याची जबाबदारी शिंदे गटाने लोकप्रतिनिधींसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपविली आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन जनतेची मते जाणून घेतली. आम्हाला सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बुधवारी सकाळी शिवसैनिक, शेतकरी, कष्टकरी, कामगार असे सर्व घटक हजारोंच्या संख्येने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी मुंबईला मार्गस्थ होणार असल्याचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी सांगितले. शिंदे गटाने नांदगावमधून सर्वाधिक १००, मालेगावमधून ५०, बागलाण ३०, येवला-चांदवड २५, पेठ २५, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीतून प्रत्येकी २०, नाशिक तालुका १५ आणि नाशिक शहरातून ३२ अशा एकूण ३३७ बस आणि ४२४ अन्य वाहनांची व्यवस्था केली आहे. सोमवारी खा. हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी बसगाड्यांसह अन्य तयारीचा आढावा घेतला.

हेही वाचा >>> वाद मिटविण्याविषयी फडणवीसांना सांगितलेच नाही – एकनाथ खडसे यांचा दावा

शिंदे गटाप्रमाणे शिवसेना (ठाकरे) गटाने मुंबईतील आपल्या दसऱ्या मेळाव्यासाठी नाशिकमधून मोठी रसद पुरविण्याची तयारी चालविली आहे. या बाबत शिवसेना कार्यालयात महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागूल, माजी आमदार बबन घोलप आदी पदाधिकाऱ्यांनी खास बैठक घेत नियोजन केले. शहरात पक्षाचे २० ते ३० माजी नगरसेवक आणि विभागनिहाय पदाधिकारी आहेत. शिवसेनेने २०० बसची मागणी राज्य परिवहन महामंडळाकडे केली होती. परंतु, सोमवारपर्यंत ५० बसची व्यवस्था झाली. त्या बस न मिळाल्यास खासगी बस आणि वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवक, शहर पदाधिकाऱ्याला प्रत्येकी एका बसमधून नागरिकांना नेण्याचे लक्ष्य दिलेले आहे. मनमाड, इगतपुरी आणि नांदगावमधील शिवसैनिक रेल्वेने मुंबईला जातील. पेठ, सुरगाणा भागातील शिवसैनिक ३५० ते ४०० जीपमधून जातील. शहरातील शिवसैनिक बसने जातील. शिवसेनेच्या मेळाव्याला जिल्ह्यातून २५ हजार शिवसैनिक व नागरिक उपस्थित राहतील असा दावा बडगुजर यांच्यासह ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाने आधीच बसची नोंदणी केल्याने शिवसेनेला राज्य परिवहन महामंडळाकडून बस मिळण्यात काहिशा मर्यादा येत आहे. त्यामुळे अधिकाधिक खासगी वाहनांची व्यवस्था करण्याची कसरत पदाधिकाऱ्यांना करावी लागत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Both shinde and thackeray factions compete for show of strength in the dussehra amy

First published on: 03-10-2022 at 21:09 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा