नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानिमित्त राज्यभरात आभार दौरा करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी सहा वाजता त्यांची हुतात्मा अनंत कान्हैरे मैदानावर आभार सभा होणार आहे. या निमित्ताने शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेशकर्त्यांचा ओघ आणखी वाढण्यासाठी तयारी करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, काही दिवसांपासून शिवसेना (उध्दव ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादीतून (शरद पवार) शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. नाशिकच्या सभेतही ती परंपरा अधिक व्यापक स्वरुपात पुढे नेण्याची तयारी स्थानिकांनी केली आहे. आभार सभेची तयारी पूर्णत्वास गेली आहे. सभेत एक लाखहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला. ठाकरे गट, मनसेसह अन्य पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यक्रर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी शिक्षणमंत्री दादा भुसे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पक्षाचे सचिव भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आदींनी कान्हेरे मैदानाची पाहणी केली. सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. एक लाख क्षमतेच्या मैदानावर गर्दी जमविणे दिव्य असते. शिंदे यांची सभा यशस्वी करून ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होणार आहे. गर्दी जमविण्यासाठी माजी नगरसेवकांना काही लक्ष्य निश्चित करून दिल्याचे सांगितले जाते. आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचा संबंध त्याच्याशी जोडला गेला. परंतु, शिक्षणमंत्री तथा शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी ते तथ्यहीन ठरवले होते.

एकनाथ शिंदे काळाराम मंदिरातही जाणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याहून हेलिकाॅप्टरने थेट हरसूल हेलिपॅडवर उतरणार असून दुपारी दोन वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी येथे जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिंदे यांचे नाशिक येथे आगमन होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजता कुंभमेळा तयारीसह इतर विषयांवर त्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. सायंकाळी ५.१५ वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात शिंदे जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.

माजी नगरसेवकांच्या पसंतीक्रमात बदल

अलीकडेच दिल्लीत विविध पक्षाच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणण्यात आला. यात काँग्रेसच्या प्रवक्त्या तथा माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रंजनाताई बोराडे, माजी नगरसेवक दीपक दातीर आदींचा समावेश होता. ठाणे येथे मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पवन पवार, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यापूर्वी ठाकरे गटासह विविध पक्षांचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले आहेत. महापालिकेच्या मागील निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची रिघ लागली होती. आता मात्र सर्वपक्षीय नगरसेवक शिंदे गटाकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm eknath shinde is visiting nashik on friday for his abhar daura sud 02