उरण : गणेशोत्सवाला अवघा महिना उरला असून गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. शासनाने शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याची व पर्यावरण राखण्याची घोषणा केली आहे. मात्र शेकडो वर्षे शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अनुदान न देता सरकार उपेक्षा करीत आहे, तर दुसरीकडे शाडूच्या मातीच्या किमतीतही १५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र मूर्तिकार अनुदानापासून वंचित आहेत.

शंभर वर्षांपासून सुंदर, सुबक व देखण्या शाडूच्या मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या चिरनेर, कुंभारपाडा, जासईसह अनेक गावांतील गणेशमूर्तींची कामे वेगाने सुरू आहेत. अनेक मूर्तिकार रात्रंदिवस या कामात व्यस्त आहेत. येथील गणेशमूर्ती या उरण, पनवेल, नवीमुंबई, मुंबई येथे पाठविल्या जात आहेत. छायाचित्राप्रमाणे शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात केवळ शाडू मातीच्याच मूर्ती तयार केल्या जात असत. आता काळाच्या ओघात कामे वेळेत उरकत नसल्याने आणि बाहेरील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मूर्तींची आवक होऊ लागल्याने, शाडू मातीपासून बनविल्या जाणाऱ्या मूर्ती या कमी होऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई: वाळूमिश्रित रस्ते उकरण्याची पालिकेवर नामुष्की!

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त आणि पाण्यात विरघळत नसतानादेखील परवडत असल्याने त्यांना अधिक मागणी आहे. मात्र महागाई असली तरी चिरनेरमधील ओमकार कला केंद्रामध्ये गणेशभक्तांची मे महिन्यापासून ये-जा सुरू होते. त्याचे कारण म्हणजे फोटोप्रमाणे गणेशमूर्ती तयार करून दिल्या जात असल्याने, या कारखान्यात गणेशभक्त ऑर्डरसाठी येत असतात, अशी माहिती ओमकार कला केंद्राचे भाई चौलकर, संदेश चौलकर यांनी दिली. दरम्यान महागाई वाढली असली तरी गणेशभक्तांकडून शाडूच्या पर्यावरणपूरक शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तींना विशेष मागणी आहे. चिरनेर येथे घडविल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीच्या कारखान्याला शंभर वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा आहे. चिरनेर कुंभारपाडा हा खास गणपती बाप्पाच्या मूर्ती व मातीची भांडी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान या कुंभार पाड्यात शाडूच्या मातीचे म्हणजे पर्यावरणपूरक मातीपासून बनविल्या जाणाऱ्या गणेशमूर्तींचे निवडक कारखाने आहेत. आज या सर्वांची तिसरी, चौथी, पाचवी पिढी शाडू मातीपासून मूर्ती घडवीत आहे.

हेही वाचा : पनवेलमध्ये १२ हजार हेक्टर भातशेती हद्दपार

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडूच्या मातीच्या किमतीत १५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर मजुरांची मजुरीही दोन हजारांनी वाढली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या किमती वाढल्या आहेत. मूर्तिकारांच्या संघटनेने मागणी करूनही शासनाने अनुदान दिलेले नाही.

मनोहर पवार, मूर्तिकार

चिरनेरमधील गणेशमूर्ती बनविण्याचा उद्याोग शंभर वर्षाहून अधिक जुना आहे. येथील सुबक, देखण्या, रेखीव, आकर्षक मूर्ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या व्यवसायात ५० हून अधिक लहान मोठे घरगुती कारखाने कार्यरत आहेत. इथे कुंभार समाजाची वस्ती आहे. आणि या समाजातील कलाकार या व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि ते त्यांचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे.

भाई चौलकर, मूर्तिकार, चिरनेर