लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेने पुणे व पश्चिम महाराष्ट्रात पवारांबद्दल निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकसभेती पराभवापासूनच ते सध्या सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेत शरद पवारांवर टीकाटिप्पणी करण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे.

अजित पवार सध्या त्यांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी दिल्लीतील एका निवडणूक तज्ज्ञाची मदत घेतली आहे. एरव्ही माध्यमांना टाळणारे अजित पवार हे सल्लागाराच्या सल्ल्यानुसार माध्यमांना मुलाखती देऊ लागले आहेत. तसेच लोकांमध्ये अधिक मिसळू लागले आहेत. लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याकरिता महिलांकडून राख्या बांधून घेत आहेत. स्वातंत्र्यदिनी त्यांनी एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांबरोबरील हातमिळवणीबाबत मौन बाळगले होते. यामुळे अजित पवारांच्या मनात नेमके काय आहे, असे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले. पण अजित पवारांची ही पद्धतशीर खेळी आहे.

हेही वाचा : BJP : भाजपा हा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान?

राष्ट्रवादीत फूट पडल्यावर अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘वय झाले, आता निवृत्त व्हा’, असा सल्ला दिला होता. तसेच भाजपबरोबर हातमिळवणीवरून शरद पवारांनी कसे तोंडघाशी पाडले, असा अनुभव कथन केला होता. पहाटेचा शपथविधी, २०१७, २०१९ मध्ये काय झाले, हे सांगत सारे खापर शरद पवारांवर फोडले होते. अजित पवारांनी जेवढी शरद पवारांवर टीका केली तेवढी शरद पवारांबद्दल सहानुभूतीच निर्माण होत गेली. काकांनी पुढे आणलेले अजित पवार हे त्यांनाच आता आव्हान देत आहेत, असे पुणे व आसपासच्या परिसरात लोक बोलू लागले.

पवार घराण्यात फूट पडावी ही भाजपची सुरुवातीपासूनच योजना होती. अजित पवारांच्या बंडामुळे भाजपला बळच मिळाले. ‘बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव करायचा आहे’, असे विधान भाजप नेते व उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने बारामतीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. शेवटी बारामतीमध्ये प्रचाराला येऊ नका, असे चंद्रकांतदादांना सांगण्याची वेळ अजित पवारांवर आली. लोकसभा प्रचाराच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख भटकता आत्मा असा केला होता. त्याची बारामती मतदारसंघात चांगलीच प्रतिक्रिया उमटली. यामुळे अस्वस्थ झालेल्या अजित पवार व त्यांच्या समर्थकांनी मोदींची छायाचित्रेच प्रचार कार्यालयांवरून हटविली होती. बारामती मतदारसंघात सूनेत्रा पवार यांच्या पराभवामागे शरद पवारांवर केलेली टीका महागात पडल्याचे अजित पवारांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी विधानसभा निवडणूक प्रचारात शरद पवारांवर टीकाटिप्पणी वा आरोप करण्याचे जाणीवपूर्वक टाळले आहे.

हेही वाचा : Punjab Govt vs Central Govt: “मला गडकरींना हे सांगायचंय की तुम्ही…”, ‘आप’ची ‘त्या’ पत्रावरून आगपाखड; पक्षप्रवक्ते म्हणाले…

शरद पवारांबरोबर हातमिळवणी करणार का, या प्रश्वावर त्यांनी मौन बाळगले. तसेच शरद पवार यांच्याबद्दल आदरच असल्याची पुष्टी जोडली. लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या विरोधात बोलण्याचे एकूणच टाळले आहे. पक्षाच्या अन्य नेत्यांनाही शरद पवारांवर टीका करण्याचे टाळा, अशा सूचना दिल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जे काही यश अपेक्षित आहे ते पुणे, नगर, सातारा या पट्ट्यातच अधिक आहे. या पट्ट्यात शरद पवारांवर टीका केल्यास त्याची प्रतिक्रिया उमटते हे अजित पवारांनी लोकसभेच्या वेळी अनुभवले होते. यामुळेच शरद पवारांबद्दल काहीसे अस्ते कदम घेण्याची त्यांची व्यूहरचना असल्याचे समजते.