महेश सरलष्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित फुटीवर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीआधी एकदिवस म्हणजेच गुरुवारी दिल्लीमध्ये शरद पवारांनी ‘मीच राष्ट्रीय अध्यक्ष’ असल्याचे ठणकावले! ‘आपल्या पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, चिंतेचे कारण नाही. मी पाच वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही वेळेला निवडून आलो. लोक फक्त चिन्ह बघून मतदान करत नाहीत’, अशी तोफ शरद पवार यांनी पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत डागली.

हेही वाचा >>> भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या कार्यकर्त्यांकडून बंडाचे निशाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नव्हे तर, अजित पवार असल्याचा दावा फुटीर गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला असून त्यासाठी काही हजार कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. शरद पवार यांच्या पक्षानेही ८-९ हजार कागदपत्रे आयोगाकडे दिली आहेत. अजित पवारांनी पक्षावर केलेल्या दाव्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दुपारी तीन वाजता दोन्ही गटांना युक्तिवादासाठी बोलावले आहे. शरद पवार यांनी पक्षात फूट पडली नसल्याचा दावा केला असला तरी, आयोगासमोरील सुनावणीमुळे दोन्ही गटांना कायदेशीर लढाई लढावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये घेऊन शरद पवारांनी अजित पवार गटाला थेट आव्हान दिले आहे.

हेही वाचा >>> सूत्रे अजित पवारांकडे, पण बोलविता धनी भाजप?

बैठकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करणारा ठराव संमत करण्यात आला. बैठकीतील भाषणामध्ये शरद पवार यांनी अजित पवार गटातील नेत्यांचा दावा खोडून काढला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये १०-११ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये माझी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध झाली. माझी निवड बेकायदा असल्याचा दावा करणाऱ्यांनीच माझ्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती, असा शाब्दिक प्रहार शरद पवार यांनी अजित पवार व प्रफुल पटेल यांचे नाव न घेता केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झालेली नसताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ही मंडळी दावा सांगत आहेत. स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून घेत आहेत. कायद्याला वगळून चुकीच्या मार्गाने पक्षावर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप पवारांनी केला.

हेही वाचा >>> शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत

राज्य सरकारमध्ये मंत्री होण्याआधी संबंधित आठ नेते माझ्याकडे येऊन गयावया करत होते. आमच्या मागे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीचा ससेमिरा लागला आहे. या अडचणीतून तुम्ही मार्ग काढा. आम्ही भाजपला पाठिंबा दिला नाही तर आम्हाला ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे जावे लागेल असे ते मला सांगत होते. या नेत्यांनी माझी सोबत सोडली. पण, अनिल देशमुख यांच्यासारखे काही नेते तुरुंगात गेले तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, असे सांगत शरद पवार यांनी भाजपला लक्ष्य केले. राज्यातील जनता आपल्यासोबत असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले की, पक्षासाठी नाव व निवडणूक चिन्ह महत्त्वाचे असते हे खरे पण, निवडणूक फक्त चिन्हाच्या आधारावर जिंकता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. बैलाची जोडी, चरखा, गाय-बछडा, हात अशा काँग्रेसच्या चार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ अशा पाच निवडणूक चिन्हांवर मी निवडणूक लढवली होती. माझे निवडणूक चिन्ह बदलले तरीही मीच जिंकलो होतो. लोक सोबत असतील तर तुम्ही निवडणूक जिंकता. आता देशातील वातावरण बदलू लागले असून लोक आपल्यासोबत आहेत, असे सांगत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar express he is still ncp chief in delhi before election commission hearing print politics news zws