शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर बंडाचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आधी भाजपाशासित गुजरातमध्ये आणि नंतर आसाममध्ये गेले. त्यामुळे शिवसेनेतील बंडामागे भाजपाचा हात असल्याचे आरोप वारंवार होत आहेत. मात्र, भाजपाकडून हे आरोप फेटाळले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना बंडामागे भाजपाचा हात नाही, मग आसामचे मंत्री गुवाहाटीतील बंडखोर आमदारांच्या हॉटेलमवर काय करतात? असा सवाल विचारला. यावर चंद्रकांत पाटलांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मला याबद्दल माहिती नाही. यातील बऱ्याच गोष्टी मला माध्यमांमधूनच कळत आहेत. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष असतानाही मला याची काहीच कल्पना नाही. मला हे सर्व पत्रकारांकडूनच कळत आहे.” टीव्हीवर या मंत्र्यांच्या भेटीगाठीचे व्हिडीओ दिसत आहेत याकडे लक्ष वेधलं असता चंद्रकांत पाटील यांनी मला टीव्ही बघायला वेळ नाही, असं म्हणत या विषयावर बोलणं टाळलं.

“देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला वेग आहे”

फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटी या नियमत आहेत. माध्यमांना आत्ता त्या लक्षात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला वेग आहे. ते त्यांना हवी असलेली दिल्लीतील बैठकीची वेळ मिळाली की उद्या जाऊ, परवा जाऊ असं न करता रात्री-बेरात्री निघतात. त्यांच्या दिल्लीतील बैठका नेहमीच जास्त होत्या, माध्यमांना आत्ता लक्षात आलं.”

“भाजपाने भूमिका स्पष्ट करावी अशी कुठलीही गोष्ट अजून घडली नाही”

राज्यात स्थिर सरकार द्यायला भाजपा पुढे येणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाही, भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी कुठलीही गोष्ट अजून घडलेली नाही. जे चाललं आहे त्याकडे स्वाभाविकपणे आम्ही राजकीय पक्ष म्हणून बारकाईने पाहत आहोत. राज्य सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलण्यासारखं सध्या काहीच घडलेलं नाही.”

हेही वाचा : तुम्ही कोणत्याही वकिलाला विचारा, बंडखोरांकडे केवळ दोनच पर्याय : आदित्य ठाकरे

“महाराष्ट्रात एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भाजपा आपलं दैनंदिन काम चालवत आहे. सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे याकडे भाजपाचं लक्ष नाही. आम्ही दैनंदिन काम करत आहोत,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrakant patil answer question on role of bjp in rebel in shivsena pbs