पुणे : पुण्यातील सर्किट हाऊस येथे आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांबाबत बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांदरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार राजेश टोपे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत चर्चा केली. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या विषायावर चर्चा झाली असेल याकडे सर्वांचे लक्ष राहिले होते. त्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिये सुळे यांनी दिली.

अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते जरी एका वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करीत असले तरी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकांच्या कामासाठी कोणाकडेही जाण्यास काहीच अडचण नाही. माझे दिल्लीत अनेक मंत्र्यांसोबत वैयक्तिक चांगले संबध आहेत. त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि लोकांची सेवा, काम दुसर्‍या बाजूला, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

हेही वाचा – अपंग, वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी; यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा

दौंड, इंदापूर, पुरंदर आणि बारामती या भागात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच उजनी धरणातदेखील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याचा गांभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावर उपाययोजना करण्यात याव्या, ही विनंती करण्यासाठी मी आले होते, असे सुप्रिया म्हणाल्या.

शरदचंद्र पवार गटाच्या नव्या चिन्हाचे अनावरण आज होणार आहे. यावर, राज्यातील जनता आजपर्यंत आमच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे आमच्या नवीन प्रवासातदेखील पाठीशी राहून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना केले.

हेही वाचा – लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे भरती; एक वर्षांसाठी काल्पनिक पदनिर्मितीस मंजुरी

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे मेळावे होते असल्याच्या प्रश्नावर, माझे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे जवळपास १८ वर्षांपासून प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. मी १५ वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी आहे. या लोकशाहीत कोणाला कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.