Pune Mumbai Ganesh Visarjan 2024 : पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून काल सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक सुरु झाली. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक विसर्जन मिरवणूक मार्गावर उपस्थित होते. तर मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन रात्री साडेसात वाजेपर्यंत झाले होते. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रात्री नऊ वाजता विसर्जन झाले.

त्यानंतर कुमठेकर रोड आणि टिळक रोडवरील डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुक पाहण्यास आलेली तरुणाई गाण्यांवर थिरकताना दिसली. मात्र रात्री १२ वाजेपर्यंतच डीजे वाजविण्यास परवानगी होती. त्यामुळे अनेक गणेश मंडळ रात्री १२ नंतर जागेवरच थांबणे पसंत केले आणि सकाळी पुन्हा सहा वाजता डीजे वाजण्यास सुरुवात झाल्यावर लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कुमठेकर रोडवरील गणेश मंडळ मार्गस्थ झाले. काल सकाळी साडे दहा वाजल्यापासून जवळपास २६ तासापासून विसर्जन मिरवणुक सुरू आहे. तर देखील नागरिकांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नाही. विसर्जन मिरवणुक मार्गावर नागरिक अद्यापही उपस्थित आहेत. यंदा तर विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लेझर लाईटचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला होता. त्यामुळे ही मिरवणुक कशा प्रकारे पोलीस यंत्रणेमार्फत पार पाडली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर गतवर्षी प्रमाणे संथ गतीने मिरवणुक सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा… Maharashtra Breaking News Live : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात उद्या बैठक, पहिल्या टप्प्यातील जागा वाटप कधी होणार?

तर या विसर्जन मिरवणुकी बाबत पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे शहरातील सर्व विसर्जन मिरवणुकीवर पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्गाचे लक्ष आहे. गणेश मंडळांना आमच्या मार्फत देण्यात आलेल्या सूचनांचं अनेक मंडळांनी पालन केले आहे. त्याबाबत महत्वाची बाब म्हणजे शहरातील मुख्य तीन रस्त्यावर सुरु असलेल्या विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटचा वापर कोणत्याही मंडळांनी वापर केला नाही. तसेच उर्वरित शहरातील मिरवणुकीत कोणी लेझर लाईटचा वापर केला आहे का ? याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर यंदा काही मंडळांनी डेसिबलची मर्यादा ओलंडल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असून ११.४५ वाजेपर्यंत अलका टॉकीज चौकामधून विसर्जन घाटाच्या दिशेने २२३ मंडळ मार्गस्थ झाले आहे. तसेच अद्यापही मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळांचे विसर्जन बाकी आहे. त्यामुळे जवळपास चार वाजेपर्यंत मिरवणुक संपण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.