पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा एकच धडाका लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा आज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. तर या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेस कोर्स या मैदानावर सभा होणार अशी घोषणा आठवड्याभरापूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून पुणे पोलिसांनी मैदानाचा ताबा घेतला होता. तर दुसर्‍या बाजूला पुणे शहर भाजपकडून मैदानावर तयार सुरू केली. पण या सर्व घडामोडी दरम्यान रेस कोर्स मैदानाच्या परिसरात वानवडी भागात राहणाऱ्या आयुष दीपक कांबळे या तरुणाने, एक सुशिक्षित बेरोजगार पुणेकर, निर्यात बंदी असो महागाई असो, बेरोजगार असो, इथल्या प्रत्येक शेतकर्‍याचा, मायमाऊलीचा, युवकांचा आक्रोश तुम्हाला तडीपार केल्याशिवाय गप्प राहणार नाही. जाती, धर्म, मंदिर, मशिद यावर बोलण्यापेक्षा विकासावर, बेरोजगारीवर बोला, या आशयाचा मजकूर असलेले फ्लेक्स सभेच्या परीसरात लावले आहेत. तर हे फ्लेक्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : खासदार संजय राऊत म्हणाले, गद्दारीची कीड..

या फ्लेक्स बाबत आयुष दीपक कांबळे या तरुणाशी संवाद साधला असता तो म्हणाला की, मी वानवडी भागात राहण्यास असून मी पदवीधर आहे. मी अनेक ठिकाणी काम मिळावे, यासाठी अर्ज केले. मात्र काही काम लागले नाही. त्यामुळे मी टेम्पो चालविण्यास सुरुवात केली आहे. पण एवढं शिक्षण घेऊन देखील आपल्याला काम मिळत नसेल तर काय करायचे, तसेच मागील दहा वर्षात देशातील कोणत्याही वर्गासाठी काम केले नाही. केवळ उद्योगपती करताच त्यांनी काम केले आहे. त्यामुळे फ्लेक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्याचे त्याने सांगितले.