पुणे : महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ एप्रिल रोजी जाहीर सभेबरोबरच पुण्यात ‘रोड शो’ होणार आहे. वातावरण निर्मितीसाठी मोदींच्या ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या खडकवासला येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन रविवारी झाले. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी सभा आणि रोड शोबाबतची माहिती दिली.

पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. सभेसाठी कात्रज, एनडीए येथील मैदानांची पाहणी महायुतीकडून करण्यात आली. खडकवासल्यामध्येही जागेची चाचपणी करण्यात आली. मात्र, प्रशस्त मैदान या ठिकाणी उपलब्ध न झाल्याने स. प. महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर वातावरण निर्मितीसाठी मोदी यांचा रोड शो नियोजित आहे. मोदींच्या सभेपूर्वी हा रोड शो होईल, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर चाळीस हजार कार्यकर्त्यांची आसन व्यवस्था होऊ शकते, त्यामुळे या जागेला प्राधान्य देण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – हडपसर भागात गोळीबाराची अफवा; पोलिसांची धावपळ

हेही वाचा – पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर बारामतीची निवडणूक ७ मे रोजी आहे. त्यानुसार बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोदी यांची सभा घेण्याचेही नियोजित होते. ही सभा खडकवासला विधानसभा मतदारसंघात व्हावी, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता.