ॲड. धनंजय जुन्नरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुपेरी पडद्यावरल्या मायावी जगासारखा माध्यमे समाजमाध्यमे आणि रेटून खोटे बोलणारे नेते व पाठीराखे यांचा व्यूहच भाजपने रचला आहे. निव्वळ कथानकवादावर हे राजकारण सुरू असून राहुल गांधी यांच्यावर आरोप करणे हाही याच राजकारणाचा भाग आहे…

पहिली बाजू’ या सदरात ‘असत्याची फॅक्टरी बंद पडेल’ या शीर्षकाखाली भाजपचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर असत्य बोलण्याची टीका केली आहे. त्याचा प्रतिवाद होणे राहुल गांधी हे काँग्रेसनेते आहेत म्हणूनच केवळ नव्हे, तर देशात गेले दशकभर चाललेल्या ‘कथानकवादी’ राजकारणाच्या व्यूहरचनेला रोखण्यासाठी गरजेचे आहे.

या कथानके रचणाऱ्या राजकारणापायीच, आदरणीय राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरविण्यासाठी समाजमाध्यमे/ माध्यमे यांद्वारे कोटी रुपये स्वाहा करून झाले… ईडी, सीबीआय, आयकर खाते आदी तपास यंत्रणांचे भय दाखवून झाले. राहुलजींची भारत जोडो यात्रा, त्यानंतरची न्याय यात्रा यांना नावे ठेवण्याचा प्रकारही करून झाला. एकंदर, राहुलजी जे जे करतील त्या सर्वांमध्ये बाधा आणण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने केल्याचे दिसले. याचेच एक उदाहरण म्हणजे, ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाच्या बँक खात्यांना सील करण्याचा- खाती गोठवण्याचा- प्रकार.

गेल्या पाच वर्षांत पक्षातील मोठे नेते ईडी, सीबीआय, आयकर खात्यांचे भय दाखवून फोडून झाले तरीही काँग्रेस पक्षाचे खासदार दुप्पट झाले हे भाजपचे खरे दु:ख आहे. या वैषम्यातून केशव उपाध्ये यांचा उपरोक्त लेख आहे. मात्र राहुल गांधी यांच्यावर असत्यकथनाचा आरोप करण्यातून भाजप पुन्हा खोट्या कथानकांचा प्रचार करत आहे, हे उघड आहे.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांचा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह परत मिळवतील का?

उदाहरणार्थ, अग्निवीर योजना. अवघे सहा महिने प्रशिक्षण घेतलेल्या कोवळ्या मुलांच्या हातात रायफल देऊन त्यांना चीन, पाकिस्तानच्या पाच-पाच वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या फौजांपुढे उभे करायचे ही कसली योजना? यात मृत्युमुखी पडलेल्या युवकांना समाजमाध्यमांवर कोणीही ‘हुतात्मा’ म्हटले तरी, अधिकृतरीत्या त्यांना शहीद/ हुतात्मा हा दर्जा नाही (शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळणारे लाभ ‘अग्निवीरां’च्या कुटुंबीयांना लागू होत नाहीत), त्यांना कँटिन नाही, त्यांना पेन्शन तर नाहीच नाही. कुटुंबीयांना अग्निवीराच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जी काही रक्कम मिळते, त्यात मोठा वाटा विम्याच्या रकमेचा असतो.

एवढी मोठी तफावत करणारी योजना काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर तात्काळ रद्द करणार आहे. शहीद अग्निवीर अजय कुमार ह्यांच्या विषयी आदरणीय राहुल गांधी यांनी ‘एक्स’- पूर्वीचे ट्विटर या समाजमाध्यमावर २२ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या नोंदीत ‘पेन्शन मिळणार नाही’ असा स्पष्ट उल्लेख आहे, त्याबाबत देशाचे संरक्षणमंत्री आजतागायत गप्प आहेत.

निवडणूक प्रचारात ‘मंगळसूत्र’, ‘जादा बच्चे पैदा करनेवाले’, ‘काँग्रेस एक भैंस चुरा लेगी’ असे विषय ओढूनताणून आणणाऱ्यांच्या अनुयायांना आता काँग्रेसच्या निवडणूक प्रचारावर असत्यकथनाचा आरोप करून स्वत:च्या बचावासाठी संविधानबदलाच्या इराद्याचा इन्कार करण्याची वेळ आल्याचे दिसते. पण अबकी बार ४०० पार ही घोषणा भाजपने दिली की नाही ? इतके पाशवी बहुमत यांना का हवे आहे, हे भाजपच्या एक नव्हे, दोघा नेत्यांनी जाहीरपणे सांगितले होते की नव्हते? संविधान बदलण्यासाठी तरतुदी करायला त्यांना ४००चा आकडा पार करायचा होता, परंतु लोकांनी हा हेतू ओळखून त्यांना गेल्या वेळच्या ३०३ च्या आकड्यापर्यंत तर नेले नाहीच, उलट बहुमताच्या २७२ या आकड्यापेक्षाही कमी जागांवर आणून बसविले. चंद्राबाबू आणि नितीशबाबू यांच्या आधारानेच यापुढे दिवस ढकलावे लागणार आहेत याचा हा त्रागा आहे.

हेही वाचा >>> अजित डोभाल यांना सन्मानाने निवृत्त करण्यासाठी नवे पद?

याउलट भाजपचा २०१४ नंतरचा पट पाहिला तर असत्य या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे भाजप ठरलेला आहे. जगात खोटे बोलणारे दोनच राजकारणी सध्या माध्यम-प्रिय आहेत, त्यांपैकी पहिले स्थान अर्थातच ‘एन्टायर पॉलिटिकल सायन्स’मध्ये विशारद असलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, तर त्याखालोखाल दुसरे स्थान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे. दोन्ही नेते एकमेकांचे मित्र. ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हीच शिकवण दोघेही आपापल्या अनुयायांना देत असतात.

अर्थात, भाजप आणि त्याचे पाठीराखे हे एरवीही असत्यकथनाचा आधार घेऊन वेळ मारून नेत असतात, हा अनुभव आतापर्यंत देशाला पुरेशा प्रमाणात आलेला आहे. परंतु ‘मोदीजी की ग्यारंटी’ म्हणजे तर खोटे बोलण्याची गॅरंटी ठरते आहे. हर खाते में १५-१५ लाख, १०० स्मार्ट सिटी, विदेश से काला धन, किसान की आय दुगनी, एमएसपी की ग्यारंटी, सबको पक्के मकान, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना या साऱ्यांमध्ये आलेले अपयश लपवण्यासाठी किती कसरती कराव्या लागत आहेत, या बाबी केशव उपाध्ये सोयिस्कररीत्या विसरले असतील. हाथरस, मणिपूर तर भाजपला आठवतही नाही.

पंतप्रधानपद हे आजही सर्वांच्या आदरास पात्र असलेले घटनात्मक पद आहे, परंतु भाजपचे प्रमुख प्रचारक या नात्याने मोदीजींची रसवंती यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जी काही बरसत होती तिला तोड नाही. राहुल गांधी यांना अदानी-अम्बानी ‘टेम्पो भरके’ पैसे देताहेत काय, मग राहुल गांधी त्यांच्याविरुद्ध का बोलत नाहीत, असा सवाल याच प्रमुख प्रचारकांनी जाहीर सभेमध्ये केला होता. प्रत्यक्षात राहुल गांधी अनेक सभांमध्ये उद्याोगपतींच्या राजकीय साट्यालोट्यामुळे देशाच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल नावे घेऊन बोलत असताना ‘राहुलजी अभी ऊन पर नही बोलते’ असे म्हणणारे खोटे ठरत आहेत, हे भारतवासींनी पुरेपूर अनुभवलेले आहे. मोदीसाहेबांच्या खोटे बोलण्याच्या या गतीपुढे आपण निवडणूक रोख्यांचा- इलेक्टोरल बॉण्ड्सचा घोटाळा विसरून गेलो आणि त्यांच्या असत्य विधानांवर गप्पा मारायला लागलो, हेही लोकांना आज लक्षात येत असेल.

राहुल हे तगडे प्रतिस्पर्धी आहेत, याची जाणीव झाल्याखेरीज मोदी यांनी इतका असत्याधारित प्रचार कदाचित केला नसता. पण मोदीजी ज्यांचा द्वेष करतात त्यांच्याचबद्दल – म्हणजे उदाहरणार्थ, मुसलमानांबद्दल- खोटे बोलतात असेही नाही. वेगवेगळ्या शतकात जन्मलेले संत कबीर, बाबा गोरखनाथ, संत नानक देव एकाच वेळी चर्चा करतात, असेही मोदीच जाहीरपणे सांगतात तेव्हा ते असत्य नाही, इतिहासाचा विपर्यासही नाही, तर मोदीजींचे सत्य मानून घ्यायचे, असा भाजप आणि पाठीराख्यांचा प्रघात असावा.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता गमावली, याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील पत्रकार खरे खोटे तपासतात. ट्रम्प यांनी चार वर्षाच्या कार्यकाळात ३०,५७३ असत्य विधाने केली म्हणजे रोज सरासरी २१ वेळ ते असत्य बोलायचे, हा हिशेब अमेरिकी पत्रकारांमुळेच जगाला कळला. मात्र आपल्याकडे, मोदी यांची असत्यवाणी होताच जणू दिव्य आकाशवाणी झाल्यासारखे ते सत्यच आहे असे सर्वप्रथम पत्रकार मानतात, नंतर ते पत्रकार लोकांना ‘प्राइम टाइम’मध्ये पटवून देऊ लागतात.

दुसऱ्या दिवशी ते असत्य अनेक दैनिकांच्या रंगीत आवृत्तीत छापून येते व त्यावर तथाकथित विद्वान चर्चा करू लागतात. एवढे नशीबवान ट्रम्प नाहीत. त्या मानाने ट्रम्प यांचे भारतीय मित्र फार भाग्यवान. मोदीजी एका सभेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात त्यांनाच भाजप दुसऱ्या सभेत, जणू न्हाऊमाखू घालून क्लीन चिट देऊन पक्षात घेते, जे घाबरत नाहीत त्यांना तुरुंगात पाठविले जाते- हे सारे जणू सत्यवादी राजकारण म्हणून आपल्याकडे खपून जाते.

या राजकारणाला कोणीही अघोषित आणीबाणी म्हणू नका… १० दिवसात देशात १५ पूल आणि रस्ते कोसळले आहेत, खचले आहेत- हे सत्य आपण बोलू शकत नाही. कारण ते भाजपनिष्ठांच्या म्हणजेच ‘हरिश्चंद्राच्या फॅक्टरी’तून आलेले रुपेरी पडद्यावरले मायावी सत्य नाही!

प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

djunnarkar92@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay junnarkar article criticizing bjp for making allegations on rahul gandhi zws
Show comments