धर्मेश शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीला बालसाहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. मुलांना केवळ परीक्षेत गुण मिळविण्यापुरतेच मराठी शिकवण्याच्यापलीकडे जाऊन बालसाहित्याचा खजिना खुला करून दिल्यास मातृभाषेविषयी आवडही निर्माण होईल…

मुले अगदी लहान वयापासूनच भाषाज्ञान अवगत करत असतात. अशा वेळी पालक त्यांच्याबरोबर कोणत्या भाषेतून संवाद साधतात, त्यांना कोणत्या भाषेतून शिक्षण दिले जाते हे मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. सध्या सगळीकडेच इंग्रजी माध्यम आणि इंग्रजी भाषेचा बोलबाला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी, प्रगतीसाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे, यात दुमत नाही मात्र आपल्या मातृभाषेकडे म्हणजे मराठीकडे दुर्लक्ष करणे, मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगणे गैर आहे.

अलीकडे दैनंदिन व्यवहारांत मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा टिकावी, समृद्ध व्हावी यासाठी मुलांमध्ये लहान वयातच आपल्या मातृभाषेविषयी आवड, आपुलकी निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांच्या भविष्याचा विचार करून गेल्या दशकापासून पालक शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची निवड करत असल्याचे दिसते. त्यामुळेच महाराष्ट्राची ही भाषा असूनही मराठी भाषकही मराठीचा वापर जास्त करत नाहीत असा सूर नेहमीच ऐकू येतो. त्या पार्श्वभूमीवर इंग्रजी आणि अन्य माध्यमांसह विविध परीक्षा मंडळांचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषेची सक्ती व्हायलाच हवी असा असे अभ्यासक आणि साहित्यिकांचे म्हणणे आहे. राज्य शासनाने पुढाकार घेत २०२० साली मराठी भाषा सक्तीची केली.

हेही वाचा : स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!

मराठी माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमांत आणि अन्य शिक्षण मंडळांच्या शाळांत मराठीखेरीज अन्य भाषा शिकण्याचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषेच्या सक्तीची अंमलबजावणी करण्याकडे दुर्लक्ष झाले. केंद्रीय तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांतही मराठी भाषा सक्तीची नव्हती. अशीच काहीशी स्थिती राज्य परीक्षा मंडळांच्या अन्य माध्यमांच्या शाळांमध्येही दिसून आली. या दृष्टीने देशातील तमिळनाडू, तेलंगणा, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ९ मार्च २०२० रोजी अधिसूचना काढली आणि १ एप्रिल २०२० पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. मराठीव्यतिरिक्त इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा कशा पद्धतीने शिकवली जावी यासाठी काही सूचना करण्यात आल्या. यात इयत्ता पहिली ते पाचवीसाठी श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण या कौशल्यांसाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे तसेच इयत्ता सहावी ते दहावी या स्तरासाठी स्व-अभिव्यक्ती (स्व-मत प्रकटीकरण), रसग्रहण, उपयोजन अशी विविध कौशल्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे आदेश शासनाने दिले.

शासनाने दिलेल्या सूचनांची शिक्षकांकडून तसेच शाळा प्रशासनाकडून योग्यरीत्या अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आवश्यक आहे. अनेकदा शाळांकडून, शिक्षकांकडून केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने अध्यापन केले जाते. अशा वेळी मुलांना शैक्षणिक वर्षाच्या दृष्टीने जरी भाषेचे ज्ञान होत असले तरी त्यांच्यात मराठीविषयी आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातातच, असे नाही. शासनाने सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होत नसल्यानेच मुलांमध्ये मराठीबाबत आवड निर्माण होत नाही, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. शाळेत मुले मराठीकडे केवळ क्रमिक भाषा म्हणूनच बघतात. त्यामुळे भविष्यात मराठीबाबत त्यांच्या मनात प्रेम निर्माण होणे अवघड आहे. लहान वयातच मुलांमध्ये मराठीबाबत आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आवश्यक आहे.

मुलांकडून मराठीचे अवांतर वाचन करून घेणे, मराठी शब्दांची गंमत सांगणे, मराठीमध्ये खेळ घेणे (इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी शब्द शोधायला सांगणे), मराठी साहित्यविश्वातील तज्ज्ञांबरोबर चर्चा घडवून आणणे, काव्य लेखन, कथा सांगणे अशा गोष्टी केल्यास इंग्रजी माध्यमामधील मुलांना मराठीची अवड निर्माण होण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा : ज्ञानपीठ आणि कापूसकोंड्या 

शालेयस्तरावर प्रयत्न होत असताना पालकांनीही कौटुंबिक पातळीवर मुलांना मराठीचे धडे देणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे, याचा बागुलबुवा करत पालक घरात इंग्रजी भाषेत मुलांशी संभाषण करण्यावर भर देतात. पाहुण्यांसमोर आपली मुले इंग्रजी किती सहज बोलतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र यामुळे मुलांच्या भाषा विकासावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष होते. लहान वयात मुले जी भाषा सर्वाधिक बोलतात त्याच भाषेतून विचार करण्याची सवय लागते आणि त्या भाषेतूनच मुले लिहितात. त्यामुळे पालकांनी मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि विकासासाठी मुलांवर भाषेचे संस्कार करणे गरजेचे आहे. यासाठी मराठीतील बालवाङ्मयाचे साह्य घेता येऊ शकते. ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध-जैन काळापर्यंतच्या पाच-सहा हजार वर्षांतील कथा-वाङ्मयात दर्जेदार अद्भुतकथा, लोककथा, बुद्धजातक कथा, पंचतंत्र, हितोपदेश कथा आहेत. यात भर पडत ते अधिक समृद्ध झाले आहे. मराठी कथावाङ्मयाच्या या विपुल खजिन्यातून मुलांना सांगण्याजोग्या कथा, कहाण्या नेमक्या निवडून बालवाङ्मयाचे पारंपरिक स्वतंत्र दालन घराघरांतील वयस्क स्त्रियांनी मोठ्या कौशल्याने तयार केले होते, जे सध्या दिसून येत नाही. त्या बरोबरीने लहानग्यांसाठी मराठी पुस्तकेही सध्या पाहायला मिळत नाहीत.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी वासुदेव गोविंद आपटे यांच्या बालसाहित्याने चिरस्मरणीय झाला होता. त्यांचे बालसाहित्याला प्रत्साहन देणारे ‘आनंद’ मासिक, रामायणांतल्या सोप्या गोष्टी, बालभारत, महाराष्ट्र देशाचा बाळबोध इतिहास, बालभागवत, वीरांच्या कथा, लहान मुलांसाठी मौजेच्या गोष्टी, बालमनोरंजन, बालविहारमाला यांसारख्या पुस्तकांनी मुलांचे भावविश्व घडवले. याच कालखंडात बिरबलाच्या चातुर्यकथा आपापली शीर्षके देऊन विविध लेखकांनी मनोवेधक भाषेत लिहिल्या. ताराबाई मोडक, म. का. कारखानीस, शं. ल. थोरात, मा. के. काटदरे, कावेरी कर्वे, देवदत्त नारायण टिळक, दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ दत्तकवी इत्यादींनी बालसाहित्यात शिशुगीते व शिशुकथांची सुरू केलेली प्रथा आजही काही अंशी का होईना सुरू आहे. याला अधिक हातभार लावणे गरजेचे आहे.

हेही वाचा : ‘एडीआर’सारखे गट हवेच, ते का?

स्वातंत्र्यपूर्व बालसाहित्यात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या बालकवी, भा. रा. तांबे, वामनराव चोरघडे, गोपीनाथ तळवलकर, साने गुरुजी, ताराबाई मोडक, ना. धों. ताम्हणकर, भा. रा. भागवत, मालतीबाई दांडेकर अशा लेखकांची पुस्तके आजही प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी वाचनीय व मार्गदर्शक ठरतात. पालकांनी या बालसाहित्याच्या माध्यमातून लहान वयातच मुलांवर मराठी भाषेचे संस्कार केल्यास मराठी भाषा लोप पावत आहे, तिचा वापर कमी होतोय, अशी चर्चा करण्याची गरज उरणार नाही. मुलांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी शासन, शाळा आणि कौटुंबिक अशा सर्वच पातळ्यांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि विकासासाठी भावी पिढीने शालेय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने मराठीकडे पाहू नये आणि त्यांची दृष्टी व्यापक व्हावी यासाठी लहान वयातच मराठी संस्कार गरजेचे आहेत.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why are efforts not being made to reach marathi balsahitya to children css