ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आले. या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच पुस्तकातील काही त्रुटी दाखवून दिल्या. तसेच या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते आनंद दिघे यांचे छायाचित्र हवे होते असे मत त्यांनी व्यक्त केले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाघाचे छायाचित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित चरित्रग्रंथाचे लेखन प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले आहे. बुधवारी रात्री या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांनी मंगळवारी रात्री या पुस्तकाची पीडीएफ आवृत्ती प्रकाशकांकडून मागवून घेतली होती. बुधवारी त्यांनी त्यांच्या भाषणात पुस्तकाचे एकप्रकारे ऑडीटच केले.

हेही वाचा…टिटवाळा बल्याणीतील बेकायदा बांधकामांवरून साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना नोटीस

अजित पवार म्हणाले की, चरित्रग्रंथाच्या दुसऱ्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लिहीले आहे. परंतु ते महाबळेश्वर तालुक्यात आहे. पूर्वी दरेगाव जावळीमध्ये होते. परंतु आता महाबळेश्वमध्ये आहे. त्यामुळे तो संदर्भ बदलण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेही छायाचित्र असायला हवे होते असे माझे मत आहे. कारण ते अधिक संयुक्तिक झाले असते असेही पवार म्हणाले.

या पुस्तकातून एक कट्टर शिवसैनिक, धडाडीचा कार्यकर्ता, धाडसी नेता अशी शिंदे यांची अनेक रुपं या पुस्तकातून वाचायला मिळतील. परंतु नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही. नातवावर एकच लहान परिच्छेद लिहीण्यात आला आहे असे ते म्हणाले. पुस्तक लिहिताना लेखक प्रदीप ढवळ यांनी उदय सामंत यांना विचारण्याऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायला हवा होता असे पवार म्हणाल्यानंतर एकच हशा पिकली. तसेच, हे पुस्तक संपूर्ण वाचल्यानंतर त्यामध्ये आणखी काही सुधारणा लक्षात आल्या, तर सुधारणा सूचवेल असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा…अजित पवार म्हणतात “मुख्यमंत्री करणार असे सांगितले असते तर…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाषण केले. पुस्तकातील २९ व्या प्रकरणात त्यांनी एक त्रुटी दाखविली. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा मी पत्रकार परिषदेत केली होती. ही घोषणा आम्ही राजभवनामध्ये केली होती. परंतु पुस्तकात ते सागर बंगल्यावर लिहिले आहे. त्यामुळे दुसऱ्या आवृत्तीमध्ये हे बदल करावे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar and devendra fadnavis highlight errors in eknath shinde s biographical book at thane launch psg