बदलापूरः बदलापुरातील एका शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांनी उत्स्फुर्त आंदोलन केले. मात्र याप्रकरणी आंदोलकांसह या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या काही माध्यम प्रतिनिधींवरही पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. यातील श्रद्धा ठोंबरे या प्रतिनिधीला उल्हासनगर न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना दिलासा मिळाला आहे.

बदलापूर पूर्वेतील एका शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशिर केल्याने आणि प्रकरण बेजबाबदारपणे हाताळल्याने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांवर राज्यभरातून संपात व्यक्त होत होता. त्यानंतर तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. सुरूवातील शाळा, पोलीस प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाविरूद्ध संतप्त नागरिक आणि पालकांनी शाळेसमोर आणि रेल्वे स्थानकात उग्र आंदोलन केले. याप्रकरणी दाखल झालेल्या तीन गुन्ह्यांमध्ये सुमारे १२०० ते १५०० जणांना आरोपी करण्यात आले होते. याप्रकरणी आंदोलनाचे वृत्ताकंन करत असलेल्या माध्यम प्रतिनिधींचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला होता. संबंधित अत्याचार प्रकरणाचे पहिल्या दिवसापासून वृत्तांकन करणाऱ्या स्थानिक माध्यम प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे यांनाही भिवंडी घटक दोनच्या गुन्हे शाखा कार्यालयात हजर राहण्याची नोटीस पोलीसांनी बजावली होती. तर आणखी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीलाही आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा : कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

या आंदोलनावेळी आंदोलकांना भडकवण्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती वकिल प्रियेश जाधव यांनी दिली आहे. मात्र हे नागरिकांचे उत्स्फुर्त आंदोलन होते. श्रद्धा ठोंबरे या आंदोलनादरम्यान पोलिसांसोबतच होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई झाल्याचे दिसून आल्याचेही ऍड. जाधव यांनी सांगितले. न्यायालयासमोर आम्ही ही बाजू मांडल्यानंतर श्रद्धा ठोंबरे यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे ऍड. जाधव यांनी सांगितले आहे. ठोंबरे यांच्यासह काही आंदोलकांनाही यावेळी जामीन मंजुर करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.