राज्याचा गृहमंत्री फडतूस : उद्धव ठाकरे; फडतूस कोण हे जनतेला ज्ञात : फडणवीस

ठाणे, नागपूर : ठाण्यात ठाकरे गटाची कार्यकर्ती रोशनी शिंदे हिला शिंदे गटाच्या महिलांनी केलेल्या मारहाणीचे मंगळवारी राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी यांची भेट घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. त्यावर, फडतूस कोण आहे, हे संपूर्ण राज्याला ज्ञात आहे, असे प्रत्युत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण केली होती. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रोशनी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

ठाण्यात शिंदे गटाची गुंडगिरी वाढायला लागल्याचा आरोप करत ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘‘महिलांचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचे ठाणे, धर्मवीर आनंद दिघेंचे ठाणे, अशी ठाण्याची ओळख आहे. पण, ती पुसून गुंडांचे ठाणे असे नामकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे’’, अशी टीका ठाकरे यांनी केली.

दरम्यान, ठाकरे गटाकडून बुधवारी ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. आता मंत्रिमंडळ विस्तारात गुंडमंत्री असे पद निर्माण करून त्या मंत्र्याला गुंड पोसण्याचे काम द्यावे.– उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली तिच्यापेक्षा जास्त खालच्या पातळीवर जाऊन मला बोलता येते. दोन मंत्री कारागृहात असताना त्यांनी त्यांचे राजीनामे घेतले नाही. तेव्हा लाळ घोटत होते. त्यामुळे खरा लाचार आणि फडतूस कोण आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy over the beating of a thackeray group activist amy