ठाणे : ठाणे शहरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असली तरी हि वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येते. पोलिसांच्या बंदी आदेशानंतरही दुपारच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, ठाण्याच्या वेशीवर अवजड वाहनांना थांबवून ठेवल्यास कोंडी होण्याची शक्यता असल्यामुळे दुपारच्या वेळेस शहरात कोंडी नसताना ही वाहतूक सुरू ठेवली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून हजारो अवजड वाहने गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. ही वाहने ठाणे शहरातून घोडबंदर येथून मुंबई अहमदाबाद मार्गे वाहतुक करतात. तसेच याच घोडबंदरहून गुजरात येथून उरण जेएनपीटी, भिवंडी, पनवेलच्या दिशेने अवजड वाहतुक सुरु असते. घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे रहिवाशांच्या वाहनांचा भार देखील घोडबंदर मार्गावर वाढला आहे. वडाळा-घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम देखील घोडबंदर मार्गावर सुरू आहे. या कामासाठी एमएमआरडीए प्राधिकरणाने मुख्य तसेच सेवा मार्गिकांवर मार्गरोधक बसविले आहेत. अवजड वाहतुक, अपघात, अरुंद रस्ते आणि मुख्य तसेच सेवा रस्त्यांची दुरावस्था या सर्व कारणांमुळे घोडबंदर मार्ग वाहतुक कोंडीचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे.

हेही वाचा : कल्याण: टिटवाळा येथे गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कसाराकडे जाणारी लोकल सेवा ठप्प

काही दिवसांपूर्वी घोडबंदर मार्गावर झालेला अपघात आणि मेट्रोच्या कामांमुळे मोठी कोंडी झाली होती. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले होते. अशी कोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अवजड वाहतुकीसंदर्भात अधिसूचना काढली. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, विसर्जनच्या दिवशी रात्रीच्या वेळेतही अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. असे असतानाही शहरात अवजड वाहनांची वाहतुक सुरूच असल्याचे दिसून येते.

याबाबत वाहतुक पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अवजड वाहनांचा प्रवेश इतर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून झाल्यास त्यांना ठाण्याच्या वेशीवर थांबवावे लागते. त्यामुळे वेशीवर अवजड वाहनांची वाहतुक वाढल्यास वेशीवर मोठी वाहतुक कोंडी होते. त्यामुळे अवजड वाहनांना काही प्रमाणात दिलासा देऊन हद्दीमध्ये प्रवेश दिला जातो असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : आमच्यामध्ये कोणताही श्रेयवाद नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वेशीवरील कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांंना दुपारी १२ नंतर प्रवेश दिला जात आहे. परंतु दुपारी शहरात कोंडी असल्यास या वाहनांना वेशीवरच थांबविले जाते. सायंकाळी ५ नंतर अवजड वाहनांना कोणताही प्रवेश दिला जात नाही.

पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक शाखा.

अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ट्रक टर्मिनस उभारणे आवश्यक आहे. अन्यथा ही वाहने सकाळी आणि रात्री रस्त्याकडेला थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे.

रोहीत पवार, रहिवासी, घोडबंदर.