लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: पक्ष संघटना मजबुती आणि लोकसभा मतदारसंघनिहाय केंद्रीय नेतृत्वावाने भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर राज्यातील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. या मतदारसंघातील पक्षाची पकड, विकास कामे याचा आढावा घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री मतदारसंघात फिरतात. म्हणून ते प्रत्येक मतदारसंघावर दावा करतात असे नाही, असे स्पष्ट करुन राज्यात लोकसभेसाठी जेथे शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत तेथे शिवसेनेचाच उमेदवार असेल, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनावश्यक चर्चांना कोणी धुमारे फोडू नये, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे सांगितले.
मागील आठवड्यापासून कल्याण
आणखी वाचा-विरोधकांकडून संभ्रम पसरवण्याचे काम, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची टीका
डोंबिवलीतील पाटीदार भवनमध्ये शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजपचे राज्यात लोकसभा मिशन-४५ सुरू आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशाप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री भाजप, शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये जाऊन तेथील विकास कामे, पक्ष संघटना आढावा यांची माहिती घेत आहेत. आपल्या मतदारसंघावर भाजप दावा करतेय, असे कोण म्हणतेय त्यांचे नाव तर घ्या, असा प्रश्न खा. शिंदे यांनी केला.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यापासून कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामे, सरकारी, पालिका कार्यालयांमधील भाजपच्या कामांविषयी नेहमीच अधिकाऱ्यांकडून अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. यामागे खा. शिंदे यांचे राजकारण असल्याचे भाजप कार्यकर्ते सांगतात. एवढेच नव्हे तर वर्षभरात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे आ. प्रमोद पाटील यांच्याशी खा. शिंदे यांनी विकास कामे, शहरातील काही कार्यक्रमांवरुन कुडमुडे राजकारण केल्यावरुन भाजप, मनसेमध्ये खासदारांच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी आहे. डोंबिवलीतील भाजपचे नंदू जोशी यांच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात खा. शिंदे यांचा पुढाकार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे ठाम मत झाले आहे. आता खा. शिंदे यांनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवूनच दाखवावी, असा थेट इशारा डोंबिवलीतील भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. भाजपचा उमेदवार असेल तरच लोकसभेसाठी काम करू, असे भाजप कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-भाजप मधील दरी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv senas claim on kalyan lok sabha information from dr srikant shinde mrj