Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सोमवारी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना टोला लगावला आहे. सुशील कुमार शिंदे यांनी श्रीनगरच्या लाल चौकात खुशाल, बिनधोक फिरावं त्यांना काही धोका नाही असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. आज काश्मीर येथील रॅलीला संबोधित करताना अमित शाह ( Amit Shah ) यांनी सुशील कुमार शिंदेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

“सुशील कुमार शिंदे, काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचे गृहमंत्री होते. ते गृहमंत्री असताना श्रीनगरच्या लाल चौकात गेले होते, मात्र तिथे फिरायची भीती वाटत होती असं त्यांनी नुकतंच मान्य केलं. मी आज त्यांना सांगू इच्छितो, शिंदेसाहेब तुम्ही लाल चौकात बिनधोकपणे फिरा, तुमच्या मुलांनाही घेऊन या. तुम्हाला काही करायची कुणाचीही हिंमत होणार नाही.” जम्मू काश्मीरच्या रामबन या ठिकाणी आयोजित करणाऱ्या आलेल्या रॅलीमध्ये अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुशील कुमार शिंदेंनी १० सप्टेंबरच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अमित शाह ( Amit Shah ) यांनी टीका केली आहे.

हे पण वाचा- “मी राहुल गांधींना सांगू इच्छितो की जोपर्यंत…”, अमित शाह यांची टीका; म्हणाले, “देशविरोधी…”

सुशील कुमार शिंदे काय म्हणाले होते?

“मी गृहमंत्री होण्याआधी शिक्षण तज्ज्ञ विजय धर यांची भेट घेतली होती. मी त्यांचा सल्ला अनेकदा घ्यायचो. त्यांनी मला सांगितलं होतं ती की तु्म्ही श्रीनगरच्या लाल चौकात जा, तिथे लोकांना भेटा. दाल लेक जो आहे तिथे जा, तिथल्या लोकांशी चर्चा करा. त्यांनी हा सल्ला दिल्याने मला प्रसिद्धी मिळाली. लोकांना वाटलं होतं की गृहमंत्री इथे फिरत आहेत. मात्र मी आतून घाबरलो होतो हे कुणाला सांगणार? ” असं शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चाही झाली होती. आता अमित शाह ( Amit Shah ) यांनी बिनधोकपणे लाल चौकात फिरा असं म्हणत सुशील कुमार शिंदेंना टोला लगावला आहे.

दहा वर्षांनी होते आहे निवडणूक

दहा वर्षांनी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नेत्यांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अमित शाह ( Amit Shah ) यांनी आपल्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस हे आपल्या कुटुंबाचं सरकार स्थापण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला तसंच राहुल गांधींवरही जोरदार टीका केली.

राहुल गांधींबाबत काय म्हणाले अमित शाह?

“काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देश पुन्हा एकदा दहशतवादाकडे ढकलायचा आहे. जम्मू काश्मीरमध्ये जर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार आलं तर ते या राज्याला पुन्हा दहशतवादात ढकलतील. मात्र मी तुम्हाला वचन देतो की आम्ही दशतवाद गाडण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे यावेळी आम्हीच जिंकणार.” असा विश्वास अमित शाह ( Amit Shah ) यांनी व्यक्त केला.