कधीकाळी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षात असणारे, त्यांचे कट्टर समर्थकच नव्हे, तर जिवाभावाचे मित्र असणारे कुमार विश्वास मध्यंतरी केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यामुळे पक्षात अस्वस्थ झाले. हे मतभेद टोकाला गेल्यामुळे त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते केजरीवाल यांचे कट्टर समर्थक न राहता कडवे विरोधक बनले. वेगवेगळ्या व्यासपीठांवर कुमार विश्वास यांनी त्यांची परखड भूमिका स्पष्ट केली आहे. पेशानं कवी असणारे कुमार विश्वास यांचा स्वभावही कवीचाच असून त्यांची टीकाही त्याच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असते. आताही केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर कुमार विश्वास यांनी केलेली सूचक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली. कथित मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी चालू होती. या चौकशीदरम्यान ईडीनं केजरीवाल यांना तब्बल ९ वेळा समन्सही पाठवले होते. मात्र, केजरीवाल यांनी ईडीसमोर चौकशीसाठी येण्यास नकार दिल्यानंतर अखेर गुरुवारी रात्री त्यांना ईडीनं अटक केली. या पार्श्वभूमीवर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात विरोधकांकडून या कारवाईचा तीव्र निषेध केला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून समर्थन केलं जात आहे. त्यातच कुमार विश्वास यांची एक सूचक पोस्ट सध्या व्हायरल होऊ लागली आहे.

काय म्हटलंय कुमार विश्वास यांनी पोस्टमध्ये?

कुमार विश्वास यांनी रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी एक पोस्ट एक्स (ट्विटर) हँडलवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कुमार विश्वास यांनी थेट अरविंद केजरीवाल यांचं नाव घेतलं नसलं, तरी त्यांचा रोख त्याच दिशेनं असल्याचं बोललं जात आहे. या पोस्टमध्ये कुमार विश्वास यांनी रामचरितमानसमधील दोन ओळी नमूद केल्या आहेत. गोस्वामी तुलसीदास यांनी कर्माची महती या दोन ओळींमध्ये सांगितली असून केजरीवाल यांच्या कारवाईसंदर्भातच विश्वास यांनी या ओळी पोस्ट केल्याचं मानलं जात आहे.

‘कर्म प्रधान विश्व रचि राखा, जो जस करहि सो तस फल चाखा’ असं कुमार विश्वास यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हे विश्व कर्मप्रधान असून जी व्यक्ती जसं कर्म करते, त्या व्यक्तीला तसंच फळ मिळतं असा साधारण या ओळींचा अर्थ होतो. या ओळींसह कुमार विश्वास यांनी त्यांचा नतमस्तक झालेला एक फोटोही पोस्ट केला आहे. मात्र, ते नेमके कशासमोर नतमस्तक झाले आहेत, हे फोटोवरून कळून येत नाहीये.

विरोधकांचं टीकास्र

दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेवर विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. “घाबरलेला हुकुमशाह एक मेलेली लोकशाही बनवू पाहात आहे. माध्यमांसहित सर्व संस्थांवर ताबा, पक्षांना फोडणं, कंपन्यांकडून हफ्ता वसुली करणं, मुख्य विरोधी पक्षाचं बँक खातं गोठवणं या गोष्टीही ‘आसुरी शक्ती’ला कमी होत्या, म्हणून आता जनतेमधून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणंही सामान्य बाब झाली आहे. INDIA याचं सडेतोड उत्तर देईल”, अशी पोस्ट राहुल गांधींनी एक्सवर केली आहे. तर अखिलेश यादव यांनी ‘भाजपा सरकार हटाओ, देश बचाओ’ अशी पोस्ट केली आहे.

मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, कारवाईविरोधात आप सर्वोच्च न्यायालयात!

तर दुसरीकडे महाराष्ट्रात शरद पवारांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “सूडाच्या राजकारणातून तपास यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याच्या या प्रकाराचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो. विशेषत: लोकसभा निवडणुकांच्या आधी हे सर्व चालू आहे. या अटकेमुळे हे सिद्ध झालं की सत्तेसाठी भाजपा किती खालच्या पातळीला जाऊ शकते. अरविंद केजरीवाल यांच्या या घटनाविरोधी अटकेच्या विरोधात इंडिया आघाडी एकत्र उभी आहे”, अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.