भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित? किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय.

Kirit Somaiya Raj Thackeray 2
किरीट सोमय्या व राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मागील अनेक दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून जोरदार विरोध होतोय. त्यांना यूपीतील साधुसंतांचाही पाठिंबा मिळालाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला आहे. याबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांना विचारलं असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या म्हणाले, “राम हा हिंदुस्थानातील देव आहे. रामाच्या चरणी कोणालाही जायला सूट असते. रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ शकतं. सगळ्यांना त्याचा अधिकार आणि सूट आहे. हे दोन विषय वेगळे आहेत.”

“माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय”

“एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना यांचं भांडण सुरू आहे. माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे लोक एकमेकांना जय रामजी की, नमस्कार, जय महाराष्ट्र म्हणत नाही, तर आदाब म्हणतात,” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला टोला लगावला.

“केंद्रीय मंत्र्यांकडून अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाचं आश्वासन”

किरीट सोमय्या म्हणाले, “३१ जानेवारीला अनिल परब यांनी ९० दिवसांमध्ये त्यांचा रिसॉर्ट पाडावा असा आदेश निघाला होता. ३ मे रोजी ९० दिवस संपले आहेत. आता केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मला आश्वासन दिलं आहे की आता रिसॉर्ट पाडण्याच्या दृष्टीने अंतिम आदेश दिला जाईल.”

“उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला”

जितेंद्र नवलानी यांनी केलेल्या आरोपांवरही किरीट सोमय्या यांनी उत्तर दिलं. “माझ्यावर जितेंद्र नवलानी यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी आरोप केले होते. त्यांनी पंतप्रधानांवर, केंद्र सरकारवर, ईडीवर, ईडीच्या चार अधिकाऱ्यांवर आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. हे सगळे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे जमवतात असे आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला,” असा आरोप सोमय्यांनी केला.

“उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर EOW चा अहवाल सार्वजनिक करा”

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, “मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला (EOW) चौकशी करायला लावली. त्या चौकशी अहवालात काय सापडलं? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर ईओडब्ल्यूचा अहवाल सार्वजनिक करावा. ते खोटारडे आणि डरपोक मुख्यमंत्री आहेत. ईओडब्ल्यूने अहवालात आरोपांमध्ये काहीच दम नाही असं लिहून दिलंय. तक्रारदार बदमाश आहेत असंही लिहून दिलंय.”

हेही वाचा : “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली, काय कारवाई झाली?”, किरीट सोमय्यांचा सवाल

“यानंतर उद्धव ठाकरे यांनी माफिया कमिशनर संजय पांडे यांना आदेश दिले. त्यांनी क्राईम ब्राँचला सांगितलं. यानंतर एसआयटीने ४० दिवस काम केलं, अनेकांचे जबाब घेतले पण काहीच निघालं नाही. म्हणून आता उद्धव ठाकरे घाबरले आहेत. आता संजय पांडे यांनी भ्रष्टाचार विरोधी विभागाला चौकशी करण्यास सांगितलं,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kirit somaiya comment on decision of raj thackeray to postpone ayodhya visit pbs

Next Story
“केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी मला आश्वासन दिलंय की अनिल परब यांचा रिसॉर्ट…”, किरीट सोमय्या यांचं दिल्लीत वक्तव्य
फोटो गॅलरी