PM Narendra Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींनी रविवारी संध्याकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या एकूण ७१ खासदारांनी पहिल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे मंत्र्यांच्या संख्येवर सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. मंत्र्यांची एकूण संख्या, त्यातील पक्षनिहाय मंत्रीपदांचं वाटप, भाजपा-जदयू-टीडीपीमध्ये झालेलं बहुतेक मंत्रीपदांचं वाटप या मुद्द्यांवर आता चर्चा होऊ लागली आहे. रविवारी झालेल्या शपथविधीमध्ये मोदींव्यतिरिक्त शपथ घेतलेल्या एकूण ७० मंत्र्यांपैकी ६० मंत्री एकट्या भाजपाचेच आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकांनंतर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. यंदा एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतकं संख्याबळ जुळवता आलं नव्हतं. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच पुढची ५ वर्षं मोदी सरकारचा कारभार चालणार आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कोणत्या पक्षाला किती महत्त्व दिलं जातं, यावर तर्क-वितर्क लावले जात होते. यासंदर्भात आता पहिल्या शपथविधीतील मंत्र्यांची सविस्तर यादी समोर आली असून त्यातून हे गणित स्पष्ट झालं आहे.

मोदी पंतप्रधान, तर भाजपाचे इतर २५ खासदार थेट कॅबिनेटमध्ये!

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर एकूण ३० खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यातले २५ एकट्या भाजपाचेच होते. त्याशिवाय संयुक्त जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष, लोजप, एचएएम आणि टीडीपी या पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. त्याखालोखाल ३६ खासदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यातही भाजपाचाच वरचष्मा राहिला असून पक्षाच्या ३२ खासदारांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे. त्याशिवाय रामदास आठवलेंच्या रुपात रिपाइंला १, जदयूला २ तर टीडीपीला १ राज्यमंत्रीपद मिळालं.

राज्यमंत्री स्वतंत्र पदभार, फक्त ५ खासदारांना संधी

याशिवाय, जे पद महाराष्ट्रात अजित पवार गटाला देण्यात आलं होतं आणि जे त्यांनी नाकारलं, त्या राज्यमंत्री पद स्वतंत्र पदभारसाठी अवघ्या पाच खासदारांनी शपथ घेतली. त्यातही भाजपाचे तीन खासदार, शिंदे गटाचा एक तर रालोदच्या एका खासदाराचा समावेश आहे.

PM Modi Cabinet 3.0 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी; ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ!

कसं आहे पक्षनिहाय मंत्रीपदांचं वाटप?

एकूण मंत्रीपदं – ७१

पंतप्रधानपद – नरेंद्र मोदी, भाजपा
कॅबिनेट मंत्री
– ३० (भाजपा-२५, जदयू-१, जेडीएस-१, लोजप-१, एचएएम-१ टीडीपी )
स्वतंत्र पदभार – ५ (भाजपा-३, शिवसेना-१, रालोद-१)
राज्यमंत्री – ३६ (भाजपा-३२, रिपाइं-१, जदयू-२, टीडीपी-१)

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यनिहाय मिळालेली मंत्रीपदं

गुजरात – ४ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
महाराष्ट्र – २ कॅबिनेट,१ स्वतंत्र पदभार, ३ राज्यमंत्री
उत्तर प्रदेश – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, ७ राज्यमंत्री
बिहार – ४ कॅबिनेट, ४ राज्यमंत्री
पश्चिम बंगाल – २ राज्यमंत्री
तमिळनाडू – २ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
हिमाचल – १ कॅबिनेट
जम्मू-काश्मीर – १ स्वतंत्र पदभार
मध्य प्रदेश – ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
हरियाणा – १ कॅबिनेट, १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
कर्नाटक – २ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
ओडिशा
– ३ कॅबिनेट
आसाम – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
आंध्र प्रदेश – १ कॅबिनेट, २ राज्यमंत्री
झारखंड – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
अरुणाचल प्रदेश – १ कॅबिनेट
पंजाब – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
तेलंगणा – १ कॅबिनेट, १ राज्यमंत्री
राजस्थान – १ स्वतंत्र पदभार, १ राज्यमंत्री
गोवा – १ राज्यमंत्री
केरळ – २ राज्यमंत्री
उत्तराखंड – १ राज्यमंत्री
छत्तीसगड – १ राज्यमंत्री
दिल्ली – १ राज्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi oath taking which party got how many minister berths pmw