सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत, तसेच विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांना मुलाखती देत आहेत. अशातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीदेखील एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसची या निवडणुकीतील आतापर्यंतची कामगिरी, प्रचार आणि आगामी धोरणांवर भाष्य केलं. तसेच त्यांनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा एक किस्सा सांगितला आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या, “मी १२ वर्षांची असताना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की मी भविष्यात भारताची पंतप्रधान होईन आणि त्यावर माझे बाबा संतापले होते.”

प्रियांका गांधी गेल्या २५ वर्षांपासून भारताच्या राजकारणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सक्रीय आहेत. १९९९ च्या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रचाराची मोहीम सांभाळली होती. तेव्हापासून त्या राजकारणात प्रत्यक्ष सहभागी आहेत. त्यांना त्यांच्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि निवडणूक कधी लढणार याबाबत प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मी निवडणूक कधी लढेन ते सांगू शकत नाही. मात्र गेल्या २५ वर्षांत डोक्यावरचे केस पांढरे झालेत आणि आता त्या केसांना काळा रंग लावावा लागतोय इतकं मी सांगेन. तसेच निवडणूक लढण्याबाबत आत्ता काही सांगू शकत नसले तरी मी पक्षासाठी काम करत राहणार आहे. गेल्या २५ वर्षांत मी निवडणूक लढले नसले तरी लोकांसाठी काम करत आले आहे. २५ वर्षांत मी भारताचं राजकारण समजू शकले, आपला देश समजून घेतला, जनतेचा संघर्ष पाहिला.” प्रियांका गांधी इंडिया टूडेशी बोलत होत्या.

विरोधक काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचे आरोप करतात. त्याचबरोबर काँग्रेसने मागील दोन्ही लोकसभा निवडणुका गमावल्यानंतर काँग्रेस यंदा तिसऱ्या निवडणुकीत पराभूत झाली तर नेहरू-गांधी कुटुंबाला काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला होऊन इतरांना संधी द्यावी लागेल असं विरोधक म्हणतात. यावर प्रियंका गांधी म्हणाल्या, “आमच्या पक्षात घराणेशाही नाही. या केवळ विरोधकांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या मनातल्या धारणा आहेत. आम्ही स्वतःकडे असं कधी पाहिलं नाही किंवा आमच्या पालकांनी आम्हाला तसं काही शिकवलं नाही. तुम्ही नेहरू गांधी कुटुंबात जन्माला आला आहात तर तुम्हाला असं करावं लागेल, राजकारणात यावं लागेल, सत्ता मिळवावी लागेल, पद मिळवावं लागेल, असल्या गोष्टी कोणी आम्हाला शिकवल्या अथवा सांगितल्या नाहीत, मी माझ्या मुलांनाही तसं काही शिकवलं नाही. आमच्या पालकांनी अशा प्रकारे आमचा सांभाळ केलेला नाही.”

हे ही वाचा >> “२०१९ मध्ये शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, पण…”, राऊतांनी सांगितल्या आतल्या घडामोडी; फडणवीस-तटकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

प्रियांका गांधी म्हणाल्या, “तुला राजकारणात यायचं आहे… पंतप्रधान व्हायचंय… सत्ता मिळवायची आहे… असल्या गोष्टी आमच्या पालकांनी आम्हाला कधी सांगितल्या नाहीत. आमच्या मनात असं काही येऊ दिलं नाही. खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे, मी तेव्हा १२-१३ वर्षांची असेन. एके दिवशी आमच्या घरी एक राजकीय ज्योतिषी आले होते. ते माझ्या वडिलांची वाट पाहत होते आणि नेमकी त्याच वेळी मी तिथून जात होते. तर त्यांनी मला थांबवलं, माझा हात पाहिला आणि मला म्हणाले मोठी होऊन तू भारताची पंतप्रधान होणार. त्याच वेळी माझे वडील तिथे आले, त्यांनी हे सगळं ऐकलं. त्यानंतर ते माझ्यावर रागावले, ते मला म्हणाले, हे काय करतेयस, हे सगळं तुझ्या मनात नाही आलं पाहिजे. या धारणा चुकीच्या आहेत.”