केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीच्या नावे सध्या वाद सुरु असून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. स्मृती इराणी यांच्या कन्येकडून गोव्यात अवैध मद्यालय (बार) चालवलं जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. स्मृती इराणी यांनी हे आरोप फेटाळले असून हे आरोप निराधार असून, मुलीची तसंच आपली बदनामी केली जात असल्याचं म्हटलं आहे. जाणून घेऊयात हा नेमका वाद काय आहे आणि आतापर्यंत यामध्ये काय घडामोडी घडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसने काय आरोप केला आहे?

शनिवारी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या मुलीचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार (Silly Souls Cafe and Bar) नावे अवैध मद्यालय सुरु असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की “इराणी कुटुंबावर भ्रष्टाचाराचे काही गंभीर आरोप आहेत. त्यांची मुलगी गोव्यात एक रेस्तराँ चालवत असून, खोट्या परवानाच्या आधारे मद्यालयही चालवलं जात आहे”.

“स्मृती इराणी यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी मागणी आम्ही पंतप्रधानांकडे करत आहोत. तुम्ही या देशाला, तरुणांना देणं लागता,” असंही यावेळी ते म्हणाले.

काँग्रेसने मद्यालयाला बजावण्यात आलेली कारणे दाखवा नोटीसदेखील शेअर केली आहे. ही नोटीस देणाऱ्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची दबावामुळे बदली केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

“स्मृती इराणींच्या मुलीकडे ज्या व्यक्तीच्या नावे परवाना आहे, त्याचा मृत्यू २०२१ मध्येच झाला आहे. हा परवाना २०२२ मध्ये घेण्यात आला. ज्या व्यक्तीच्या नावे परवाना आहे तो ह्यात नसल्याने हे बेकायदेशीर आहे,” असा आरोप पवन खेरा यांनी केला.

पवन खेरा यांनी एक लेखही शेअर केला ज्यामध्ये मुलीच्या रेस्तराँचं कौतुक होत असल्याने, स्मृती इराणी यांना आई म्हणून अभिमान वाटत असल्याचा उल्लेख आहे. हा लेख ट्विटरला शेअर करताना पवन खेरा यांनी म्हटलं आहे की “कोणत्या स्मृती झुबीन इराणी खोटं बोलत आहेत? १४ एप्रिल २०२२ ला आपल्या मुलीच्या रेस्तराँबद्दल अभिमान वाटत आहे म्हणणाऱ्या की आता आपल्या मुलीचा सिली सोल्स बार अॅण्ड कॅफेशी काही संबंध नाही म्हणणाऱ्या?”.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बेकायदेशीरपणे मद्यालय सुरु असल्याची कागदपत्रं समोर आल्याने स्मृती इराणींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. संसदेतही आपण हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“केंद्रीय मंत्रिमंडळात असणाऱ्या वरिष्ठ नेत्याचा प्रभाव असल्याशिवाय अशाप्रकारे बेकायदेशीर काम होणं शक्य नाही. या व्यक्तीने (इराणी) १२ डिसेंबर २००४ ला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला होता. आज आम्ही पंतप्रधानांकडे स्मृती इराणींचा राजीनामा घेण्याची मागणी करतो,” असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक प्रशांत प्रताप यांनीदेखील कुणाल विजयकर यांच्या ‘खाने मै क्या है’ कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विजयकर एका रेस्तराँमध्ये गेले होते. त्यांनी या रेस्तराँचे फोटो शेअर करताना हे रेस्तराँ जोइश इराणी यांच्या मालकीचं असल्याचा उल्लेख केला होता.

स्मृती इराणी यांचं आरोपांवर काय म्हणणं आहे?

स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले असून हा बदनामीचा कट असल्याचा आरोप केला आहे. “माझी मुलगी बेकायदेशीर मद्यालय चालवते हा आरोप द्वेषातून करण्यात आला असून, केवळ तिच्या चारित्र्याचं हनन केलं जात नसून राजकीयदृष्ट्या मलाही बदनाम करण्याचा हेतू आहे,” असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे.

स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेतृत्वाने म्हणजेच गांधी कुटुंबाने दिलेल्या आदेशांनुसार आपल्यावर आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे. “माझ्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भारतीय तिजोरीतून पाच हजार कोटींची लूट केल्याप्रकरणी जाब विचारण्याचं धाडस असल्यानेच हे आरोप केले जात आहेत,” असा त्यांचा दावा आहे.

काँग्रेस नेते आपल्या मुलीची जाहीरपणे बदनामी करत असल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. “काँग्रेस नेते आपल्या मुलीच्या चारित्र्याचं हनन करत असून, कारणे दाखवा नोटीस दाखवत हे केलं जात आहे. या कागदपत्रांमध्ये माझ्या मुलीचं नाव कुठे आहे?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

“एक १८ वर्षांची मुलगी, कॉलेज विद्यार्थिनीच्या चारित्र्याचं काँग्रेस नेते पक्ष मुख्यालयात बसून हनन करत आहेत. तिची इतकीच चूक आहे की, तिच्या आईने २०१४, २०१९ मध्ये राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली होती,” अशी टीका त्यांनी केली आहे.

स्मृती इराणींकडून काँग्रेस नेत्यांना नोटिसा

स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या आहेत. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी त्यांनी केली आहे. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा त्यांनी दिला आहे.

ही नोटीस महिला काँग्रेस नेत्या नेट्टा डिसूजा आणि काँग्रेस पक्षालाही पाठवण्यात आली आहे. आमच्या आशिलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचाही नोटीसमध्ये उल्लेख आहे.

महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत असलेल्या आणि आयुष्याच्या नवीन टप्प्यातील उंबरठ्यावर असणाऱ्या मुलीवर हल्ला करुन काँग्रेस नेत्यांनी अजून खालची पातळी गाठल्याचं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is the controversy over smriti irani daughter sgy
First published on: 25-07-2022 at 14:26 IST